लोणी : सकाळी रस्त्यावर गर्दी करून गप्पा मारत उभी असलेली ग्रामीण भागातील माणसे कडक निर्बंधांच्या काळात दिसेनाशी झाल्याने आपापसातला जणू संवादच हरवल्याची स्थिती झाली असल्याचे सध्या दिसत आहे. एरव्ही सकाळी ७ वाजताच गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा घोळक्याने उभे असलेले गावकरी आता दिसत नाहीत.
रस्त्याच्या कडेला दांडीच्या पातेल्यात उकळी फुटलेल्या चहाच्या वाफा नाहीत, की त्याचा दरवळ नाही. कढईत उकळणाऱ्या तेलातल्या वड्यांचा व भज्यांचा सुर्र आवाजही नाही आणि गावात घडलेल्या घटनांची चर्चाही नाही. "चल या बातीवर" चहा पाजतो असे हातावर टाळी देऊन दणक्यात आवाज देणारा वर्ग रस्त्यावरून गायब झाला आहे. त्यामुळे पाजणारे व त्यांच्याकडून चहा पिणारे कोणीच दिसत नाहीत. सकाळच्या गप्पाटप्पा व चहा, नाश्ता टपरीवर जाऊनच करायचा असा दंडक असलेल्या मंडळीची संख्या ग्रामीण भागात मोठी असते. त्यामुळे सकाळी ६ वाजेपासूनच रस्ते गर्दीने जिवंत होतात. कोरोना काळातील निर्बंधांमुळे गावाकडचे रस्ते जणू 'मुके' झाल्याचा अनुभव सध्या येत आहे. नेहमी गर्दीतून वाट काढताना हॉर्न वाजवताना दिसणाऱ्या दुचाकी गाड्या व चारचाकी वाहने आता रस्त्यावर चिटपाखरू नसल्याने भरधाव वेगाने जाताना दिसत आहेत. कालच्या रात्री वीज गेली होती, कोणाच्या घरात भांडण झाले, गल्लीतल्या आयपीएलमध्ये कोण जिंकले व कोण हरले, शेजारच्या मुलीला बघायला कुठले पाहुणे आले होते यापासून तर सरकार कोणाचे येणार व पडणार इथंपर्यंत दररोज रंगणारा गप्पांचा फड हे सगळे सध्या बंद असल्याने समाज मन अस्वस्थ आहे. घरात बसून घुसमटत आहेत. संवादाने कट्टी घेतली आहे. केव्हा हा कोरोना संपतो आणि सगळे सुरळीत होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगर-मनमाड रस्त्यावरचे कोल्हार, बाभळेश्वर, पिंपरी निर्मळ, राहाता, शिर्डी असो की, लोणीमधून जाणारा कोल्हार घोटी रस्ता किंवा नांदूर शिंगोटेमार्गे नाशिकला रस्ता असो यांच्यासह ग्रामीण भागातील आणि या भागातील गावामधील वर्दळ सध्या तरी चिडीचूप झाली आहे.
..............
आमचे निम्मे गाव सकाळी रस्त्यावर जमा झालेले असते, गप्पा गोष्टी रंगलेल्या असतात. गावातला संवाद येथे अनुभवायला मिळतो. सध्या संवाद थांबला असला तरी गावकरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन करत आहेत, हे दिवसही निघून जातील अशी सर्वांना अपेक्षा आहे.
- डॉ. मधुकर निर्मळ, सरपंच, पिंपरी निर्मळ, ता.राहाता
...................
कोणी मित्रांसोबत जात आहे, तर कोणी कुटुंबासह. गेली चार महिने ज्या लसीची प्रतीक्षा होती, ती लस घेताना तरुणांमध्ये प्रचंड उत्स्तुकता आहे. लसीकरनानंतर कोरोनावर विजय मिळविणारच, हा विश्वास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत आहे. त्यामुळे मुके झालेले रस्ते आणि गावकऱ्याचे फिके झालेले संवादही सुरू होतील.
-मनोज आरगडे, तरुण शेतकरी, निमगाव जाळी, ता. संगमनेर