भातकुडगाव : मालकी हक्काच्या शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ता खुला करावा, या प्रमुख मागणीसाठी ढोरसडे (ता. शेवगाव) येथील धरणग्रस्त चार शेतक-यांनी मंगळवारी सकाळपासून जायकवाडी धरणाच्या पाण्यात जलसमाधी आंदोलन सुरू केले. गुरूवारपासून शेतकरी उपोषणाला बसले असून मंगळवारी उपोषणाचा सहावा दिवस आहे.ढोरसडे येथील अनिकेत गंगागीर गोसावी, दत्तात्रय भाऊसाहेब माळवदे, ज्ञानदेव भाऊसाहेब खंबरे, भगवान एकनाथ काळे या शेतक-यांनी पाण्यात प्रवेश करून जलसमाधी आंदोलन सुरू केले. भाजपचे तालुका उपाध्यक्ष गुरूनाथ माळवदे, गणेश खंबरे, बाळासाहेब गाडे आदींसह ५० ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.या धरणग्रस्त शेतक-यांच्या ढोरसडे शिवारात शेतजमीन गट नं ५५/२, ५६/२, ५४ पैकी ४९ आदी ठिकाणी शेतजमिनी आहेत. शेतात जाण्यासाठी रस्ता खुला करावा यासाठी वेळोवेळी निवेदने, मोर्चे काढले. तरीही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने शेतक-यांनी गुरूवारपासून उपोषण सुरू केले.यंदा गहू, हरभरा या पिकांचा हंगाम जवळपास संपला असून ऊस लागवडीलाही विलंब झालेला आहे. शेतातील अगोदरच्या पिकाचेही नुकसान झाल्याने मोठा आर्थिक भुर्दंड शेतकºयांना सहन करावा लागला. नुकसानीचा पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी, रस्ता खुला करण्याबाबत प्रशासनाकडून त्वरीत योग्य निर्णय व्हावा, अशा शेतकºयांच्या मागण्या आहेत. दरम्यान, प्रशासनाचा कोणताही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नसल्याचे भाजपचे तालुका उपाध्यक्ष गुरूनाथ माळवदे यांनी सांगितले.
जायकवाडी धरणात ढोरसडे येथील शेतक-यांचे जलसमाधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 4:30 PM