कोपरगाव : दुकान बंद करून दुचाकीवरून घरी जात असताना चार अज्ञात चोरट्यांनी एका व्यापाऱ्यास लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील बॅगेत असलेले ४ लाख ९८ हजार ९०० रुपयांची रोख रकमेसह मोबाईल लुटून नेले आहे. कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकाजवळील भाईभाई गॅरेजसमोर शुक्रवारी (दि.११) रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चार अज्ञात चोरट्यांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
व्यापारी दिलीप शंकर गौड यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले की, कोपरगाव शहरातील किशोर वाईन्स हे दुकान सहा महिन्यांपूर्वी चालविण्यास घेतले आहे. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मी दुकान बंद करून दुकानातील दिवसभरात जमलेली रोख रक्कम ४ लाख ९८ हजार ९०० सोबत घेऊन आपल्या स्कुटीवरून घरी जात होतो. दुसऱ्या दुचाकीवर दुकानाचा मजूर सचिन साळवे हे माझ्यासोबत होते. भाई-भाई मोटार गॅरेजसमोर आलो असता पाठीमागून विनानंबरच्या दोन दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ९८ हजार ९०० रोख रक्कम एक टॅब व दोन मोबाईल तसेच कागदपत्रे असलेली बॅग लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून बळजबरीने चोरुन नेली आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहे. याप्रकरणी व्यापारी दिलीप शंकर गौड (रा. निवारा, कोपरगाव) यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.