आष्टी येथील महेश भाऊसाहेब गव्हाणे हे ३ एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजता माळीवाडा बसस्थानक येथे आष्टीला जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत होते. यावेळी त्यांच्याजवळ आलेल्या एका कारचालकाने तुम्हाला आष्टी येथे सोडतो असे सांगून त्यांना कारमध्ये बसविले. या कारमध्ये आधीचे तीनजण बसलेले होते. कारमध्ये बसल्यानंतर गव्हाणे यांना जबरदस्तीने नगर तालुक्यातील सारोळे शिवारात निर्जन ठिकाणी नेले. तेथे गव्हाणे यांना लोखंडी रॉडने मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल, घड्याळ असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांच्या फोन पे मधूनही जबरदस्तीने रक्कम ट्रान्स्फर करून घेतली. या घटनेनंतर गव्हाणे यांनी ४ एप्रिल रोजी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
............
कारवाले लुटारू तेच, गुन्ह्याची पद्धतही तीच
माळीवाडा बसस्थानक येथे २ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता वाहनांची वाट पाहत असलेल्या सिन्नर येथील सेल्समनला याच लुटारूंनी कारमध्ये बसवून निमगाव वाघा परिसरात नेऊन लोखंडी रॉडने मारहाण करत लूटमार केली. सलग दोन दिवस एकाच ठिकाणाहून प्रवाशांना कारमध्ये बसून लूटमार केल्याने घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, गेल्या तीन-चार महिन्यांत माळीवाडा बसस्थानकातून प्रवाशांना कारमध्ये बसवून याच पद्धतीने लूटमारीच्या अनेक घटना घडल्या आहेत.
..........
माळीवाडा बसस्थानकातून प्रवाशांना कारमध्ये बसून लूटमार करणारी टोळी एकच असून, पोलीस त्यांचा सर्वत्र शोध घेत आहेत. येत्या काही दिवसांत ही टोळी जेरबंद होईल.
-राकेश मानगावकर, पोलीस निरीक्षक कोतवाल पोलीस ठाणे