अहमदनगर-सोलापूर रोडवरील कॅन्टोन्मेंट नाक्यावर सात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून नाक्यावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करत ४६ हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी तीन वाहने ताब्यात घेत दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी नाक्यावरील सुपरवायझर अजय सुगंध शिंदे यांनी फिर्याद दिली. त्यावरून आरोपी संदीप ऊर्फ म्हम्या शरद शिंदे (रा. बुरुडगाव रोड, नगर), विक्रम गायकवाड (रा. वाळुंज पारगाव, ता. नगर), बाबा आढाव (रा. वाळुंज पारगाव), संदीप वाकचौरे (रा. दरेवाडी, ता. नगर), प्रकाश कांबळे (पूर्ण नाव नाही, रा. कोंबडीवाला मळा, नगर) व इतर दोन अनोळखी इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी छावणी परिषद नाक्यावर स्कॉर्पिओ व दोन मोटारसायकलवर आले. आरोपी गायकवाड व आढाव यांनी हत्यार काढून नाक्यावरील सुपरवायझर सचिन तुकाराम पवार यांच्याकडे दर महिन्याला हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी केली. पवार यांनी तुम्ही आमच्या मॅनेजरशी बोला असे सांगितले. परंतु त्याचा राग आल्याने आरोपींनी सचिन यांना मारहाण सुरू केली. इतर कर्मचारी मदतीला धावले. परंतु तोपर्यंत बाबा आढाव याने त्याच्याकडील कोयत्यासारखे हत्यार काढून सचिन पवार यांच्यावर वार केला. त्यात ते जखमी झाले. तोपर्यंत इतर आरोपींनी कॅश काऊंटरला जाऊन तेथे असलेल्या हनुमंत प्रकाश देशमुख यास मारहाण करून ४६ हजार ७४० रूपयांची रोख रक्कम काढून घेतली. तोपर्यंत नाक्यावरील सर्व कर्मचारी जमा झाल्याचे पाहून आरोपींनी वाहने तेथेच सोडून पळ काढला. या मारहाणीत अजय सुगंध शिंदे, हनुमंत प्रकाश देशमुख व सचिन तुकाराम पवार हे जखमी झाले.
घटनेनंतर पोलिसांनी पाहणी केली असता विनाक्रमांकाची स्कॉर्पिओ व दोन दुचाक्या ताब्यात घेण्यात आल्या. याशिवाय रात्री आरोपी संदीप शिंदे यास ताब्यात घेण्यात आले. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.