अहमदनगर : पाथर्डी तालुक्यात महामार्गावर वाहनचालकांना अडवून लूटमार करणारी चौघांची टोळी गुरुवारी (दि़१५) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली.जाकिर सुभान शेख (वय ४४), शंकर नारायण फुंदे (वय २६), रूपचंद श्रीधर आंधळे (वय २८) व गोकुळ राधाकृष्ण फुंदे (वय २५, रा. सर्व फुंदे टाकळी ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. या चौघांनी १३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा येथे मुकेश कुमार जयस्वाल (वय २७, रा. घुलेवाडी फाटा ता. संगमनेर) याच्या ट्रकला टेम्पो आडवा लावून मारहाण करत त्याच्याकडील ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपाधीक्षक मंदार जावळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
पाथर्डी तालुक्यात महामार्गावर लुटणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 14:10 IST