अहमदनगर : हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली असून शनिवारी अनेक ठिकाणी रोहिणी नक्षत्रातील सरी बरसल्या.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे अंगावर वीज कोसळून महिलेेचा जागीच मृत्यू झाला. यात चार शेळ्यांचाही मृत्यू झाला. अनिता उर्फ मुक्ताबाई संजय वणवे (वय ४०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या शेळ्या चारण्यासाठी शेतात गेल्या होत्या. शनिवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यात वीज पडल्याने त्यांच्यासह चार शेळ्यांचा मृत्यू झाला. याशिवाय नगर शहरातील जामखेड रोड, चांदणी चौक, दरेवाडी आदी भागात पाऊस झाला. श्रीगोंदा शहरातील देवदैठण येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. शेवगाव तालुक्यातील ढोरसडे, शहरटाकळी, देवटाकळी येथे शनिवारी सायंकाळी रोहिणीच्या सरी बसरल्या. पारनेर तालुक्यातील जवळे, अकोले शहर, राहुरी तालुक्यातील म्हैसगाव, जामखेड शहर व परिसर, पारनेर तालुक्यातील पश्चिम भागातील आळकुटी, श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. भंडारदरा परिसरात रात्री उशिरा मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. दरम्यान, आतापर्यंत दोनदा झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मशागतीची तयारी सुरु केली आहे.