अहमदनगर : येथील महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी संजय शेंडगे यांची तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली. आज झालेल्या ऑनलाईन सभेत दोघांचेच एकमेव अर्ज असल्याने पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली.
शेंडगे आणि भोसले यांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यानंतर महापालिकेच्या सभागृहात रीतसर प्रक्रिया पार पाडल्यानंतर दोघांच्या नावांची जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घोषणा केली. रोहिणी शेंडगे यांना सेनेच्या नगरसेविका पुष्पा बोरुडे व अनिल शिंदे हे तर गणेश भोसले यांना कुमारसिंह वाकळे व समद खान हे अनुक्रमे सूचक व अनुमोदक आहेत.
नगर महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली. महाविकास आघाडीचा धर्म पाळत शेवटच्या क्षणी कॉंग्रेसनेही अर्ज दाखल करण्याची भूमिका सोडून देत महाविकास आघाडीत सहभाग घेतला. त्यामुळे महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.
नगर शहरात एकमेकांचे विरोधक असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीची प्रथमच आघाडी झाली असून दोघांच्या संमतीनेच महापौरपदी सेनेच्या शेंडगे यांची निवड करण्याचा निर्णय झाला होता. शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीबाबत मुंबईत वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्याने दोन्ही पक्षाचे नगरसेवकांनी वरिष्ठांच्या निर्णयाला संमती दिली.
सुरवातीला बाजुला पडलेल्या कॉंग्रेसने अर्ज दाखल करण्याची भूमिका सोडून दिली. त्यामुळे शेंडगे व भोसले यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. महापालिकेचा आज १८ वा स्थापना दिन आहे. याच दिवशी अहमदनगर शहराला नवा महापौर मिळाला आहे.