Jayant Patil ( Marathi News ) : अहमदनगर- राष्ट्रवादी शरद पवार गटाने आज शिर्डी येथे शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरातून शरद पवार गट लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. आजपासून शिबीराला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटात अंतर्गत वाद असल्याचे बोलले जात आहे. पहिल्याच दिवशी आमदार रोहित पवार गैरहजर राहिले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
आमदार रोहित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात अंतर्गत कलह असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी राज्यात काढलेल्या यात्रेकडे जयंत पाटील यांनी पाठ फिरवली होती.आणि आज रोहित पवार ज्या जिल्ह्यात राजकीय नेतृत्व करतात त्याच जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या सुरु असलेल्या शिबीराला गैरहजर आहेत, यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावर आता स्वत: जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवनीत राणा प्रहारच्या तिकीटावर लोकसभा लढविणार? बच्चू कडूंनी विधानसभेचेही पत्ते उघडले
"आमदार रोहित पवार बाहेरच्या देशात दौऱ्यावर आहेत, त्यामुळे ते आजच्या शिबीरासाठी गैरहजर आहेत.शिबीराची आज आणि उद्या दोन दिवसाची मुदत आहेत. शिबीराची तारीख ठरल्यानंतर त्यांनी मला आधीच कळवले होते की, ते बाहेरच्या देशात असणार आहेत. त्यामुळे गैरहजर असेन. रोहित पवार परदेशातून लवकरच येतील, असंही जयंत पाटील म्हणाले.
'आजच्या शिबीराला फक्त पदाधिकाऱ्यांना बोलावले आहे. फक्त १७०० लोकांना शिबीराचे निमंत्रण दिले आहे. तरीही आजच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे, असंही पाटील म्हणाले. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचा पक्ष चांगल काम करेल. मागच्या फळीतील पदाधिकारी आजच्या शिबीराला पुढे बसले आहेत, नवीन नेतृत्वाला संधी मिळत आहे, असंही पाटील म्हणाले.
'किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप चुकीचे'
आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खासदार शरद पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले. यावर त्यांनी चौकशीची मागणी केली. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, किरीट सोमय्या यांनी याआधीही अनेकांवर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्याचा रिझल्ट काय आला हे आपल्याला माहित आहे. त्यांचे आरोप निवडणुकीचे वातावरण निर्मिती करण्याचा उद्देश आहे, असंही पाटील म्हणाले.