जामखेड : राष्टवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांच्या जामखेड शहरात शुक्रवारी काढलेल्या विजयी मिरवणुकीत चार टन गुलालाची उधळण करण्यात आली. हा गुलाल उधळण्यासाठी ३० जेसीबी, पाच पोकलेन, क्रेनचा वापर करण्यात आला. शहरातील रस्त्यांवर गुलालाच खच पडला होता. सर्व रस्ते लालेलाल झाले होते. शहरात अशी मिरवणूक प्रथमच निघाली होती. मिरवणुकीनंतर रोहित पवार यांनी साकत येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.पवार हे आमदार झाल्यानंतर प्रथमच जामखेड शहरात आले होते. कार्यकर्त्यांनी ते येण्याअगोदरच मिरवणुकीची जय्यत तयारी केली होती. मिरवणुकीदरम्यान गुलाल उधळण्यासाठी ३० जेसीबी, पाच पोकलेन, क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी जेबीसी उभे करण्यात आले होते. रोहित पवारांसह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास शहरातील कोठारी पेट्रोलपंपापासून मिरवणुकीत सुरुवात झाली. त्यानंतर जेसीबीच्या बकेटमधून मिरवणुकीवर गुलालाची उधळण केली जात होती. पेट्रोलपंपापासून सुरू झालेल्या मिरवणुकीस बाजार समितीपर्यंतचे दोन किलोमीटर अंतर कापून जाण्यास पाच तास लागले. ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, राष्टवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, युवक नेते सूर्यकांत मोरे, उद्योजक रमेश आजबे, नगरसेवक पवनराजे राळेभात, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, दादासाहेब ढवळे, आदींसह हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.मिरवणुकीनंतर बाजार समिती आवारात सभा झाली. यावेळी पवार म्हणाले, कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रत्येक गावात कुकडीचे पाणी शेतीला मिळावे यासाठी दोन प्रकारचे सर्व्हे करण्याचे काम सुरू झाले आहे. अडीच महिन्यात याबाबत अहवाल मिळाल्यानंतर राज्य सरकारला तो सादर करून पाणी आणण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. मतदारसंघातील आगामी पाच वर्षात काय काम करायचे याबाबत विकास आराखडा तयार करण्याचे काम चार दिवसांपूर्वी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.जामखेड तालुक्यातील साकत येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलो होतो. परंतु, त्यापूर्वी जामखेड शहरातील कार्यकर्त्यांनी तुमची मिरवणूक आयोजित केली आहे, असे सांगितले होते. मी मिरवणूक काढण्याबाबत नकार दिला होता. परंतु, कार्यकर्त्यांनी आम्ही तुमचे निवडणूक काळात ऐकले आता तुम्ही आमचे ऐका, असा आग्रह धरला. त्यामुळे जावे लागले. मिरवणूक छोटी आहे की, मोठी याबाबत कल्पना नव्हती. मिरवणूक सुरू झाल्यानंतर तिचे स्वरूप समजले, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
रोहित पवारांनी जामखेडमध्ये ३० जेसीबीने उधळला चार टन गुलाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 2:14 PM