पाथर्डी : तालुक्यातील एकनाथवाडी येथे सन २०११ ते २०१४ या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने जनहीत याचिकेत जिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सहा महिन्यात चौकशी करून दोषींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.तालुक्यात सन २०११ ते २०१४ या कालावधीत एकनाथवाडी येथे रोजगार हमी योजने अंतर्गत जागेवर कामे न करता अंध, अपंग, शासकीय नोकर, मयत मजूर कामावर दाखवून अर्धवट अवस्थेत यंत्राने कामे करून लाखो रुपयांची बिले काढण्यात आले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते बाबा भगवान सानप यांनी १४ आॅक्टोबर २०१३ रोजी एकनाथवाडीचे तत्कालीन सरपंच तथा मनसेचा जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांच्यासह रोहयो कामाशी निगडीत अधिका-यांनी संगनमत करून मोठा भ्रष्टाचार केल्याची तक्रार जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केल्या. तक्रार अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश झाले.दरम्यान, सानप यांच्या तक्रारीवरून राहुरी येथील पंचायत समितीचे कृषी अधिकारी व्ही.एच.पालवे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी एस.बी.काशीद, मोहीम अधिकारी डी.आर.राऊत यांनी रोहयो कामांची चौकशी केली असता एकनाथवाडी येथे रो.ह.यो. च्या माध्यमातून करण्यात आलेल्या आठ रस्त्यांची तसेच वृक्ष लागवडीच्या कामाची इन-कॅमेरा चौकशी करण्यात आली होती. आठ पैकी पाच रस्त्यांवर थोड्या फार प्रमाणात कामे करून इतर तीन रस्त्यांची कामे न करताच सुमारे ६१ लाख ६५ हजार रुपयांच्या रकमेचे बिले काढून काँक्रिटीकरण रस्ता कामाचे अभिलेख, मोजमाप पुस्तिका हजेरी पत्रकावर हस्ताक्षर,स्वाक्ष?या यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावती चौकशी समितीच्या निदर्शनास आल्या.याबाबत देविदास लिंबाजी खेडकर, तत्कालीन उपअभियंता के.ए.गीते, शाखा अभियंता एन.के.भणगे, शाखा अभियंता एस.एस.गडदे, तत्कालीन शाखा अभियंता डी.पी गावीत, प्रभारी उपअभियंता बि.डी.काकडे, ग्रामसेवक एस. बी.काळे तसेच सेवानिवृत्त कृषी अधिकारी एस,एम,कांबळे, तांत्रिक पॅनलचे वनाधिकारी सचिन वायकर, गटविकास अधिकारी तसेच ग्राम रोजगार सेवक गणेश खेडकर हे दोषी असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला होता. परंतु २०१४ पासून २०१८ पर्यंत राजकीय दबावामुळे दोषी कारवाईपासून वंचित राहिले होते. दोषीवर कारवाईचे आदेश होवूनही पुढे गैरव्यवहारातील दोषीवर काहीच कारवाई झाली नाही त्यामुळे ग्रामस्थ बाबा सानप यांनी उच्च न्यायालय मुंबई,खंडपीठ औरंगाबाद येथे प्रशासना विरुद्ध वकील प्रशांत नांगरे यांच्या मार्फत जनहित याचीका दाखल केली होती.एकनाथवाडीचे ग्रामस्थ बाबा सानप यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर २६ एप्रिल रोजी न्यायाधीश एस.एम.गव्हाणे तसेच न्यायाधीश एस.एस.शिंदे यांच्या समोर सुनावणी झाली. जिल्हाधिकारी तसेच जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकनाथवाडी गैरव्यहार प्रकरणी शासकीय सेवेत असलेल्या दोषींवर सहा महिन्यात खातेनिहाय चौकशी पूर्ण करून कारवाई करणार असल्याबाबत शपथपत्र यापूर्वीच उच्च न्यायालयात दाखल केले होते. त्याच अनुषंगाने उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घोटाळ्यातील शासकीय सेवेत असलेल्या दोषींवर खातेनिहाय चौकशी करून सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एकनाथवाडी येथील सुमारे ६१ लाख रुपयाच्या रोहयो गैरव्यवहारातील दोषी असल्याचा ठपका असलेला मनसेचे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर याच्यासह इतर दोषीवर फौजदारी कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.एकनाथवाडी येथे रोहयो अंतर्गत झालेल्या रोपवाटिका, शेततलाव, रस्ते, वृक्षलागवड या कामांमध्ये मयत मजूर कामावर दाखवून पोस्टात बनावट खाते उघडून मजुरीचे लाखो रुपये हडप करण्यात आले आहेत.