डॉ. कुमार यांनी बुधवारी (दि. १८) तालुक्यातील चिंचोली गुरव येथील सुरावी शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अजय थोरे, कोपरगाव पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे आदी उपस्थित होते. सुरावी शेतकरी उत्पादक कंपनीने कोरोनाच्या काळात दररोज एक ते दीड लाख अंडी विक्री केली. संगमनेर, कोपरगाव व सिन्नर (जि. नाशिक) तालुक्यातील पोल्ट्री फार्मधारक शेतकऱ्यांकडून ही अंडी गोळा करुन मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे याठिकाणी अंडी पुरवली गेली. कंपनीच्या या उपक्रमाची दखल राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने घेतली. त्यामुळे या कंपनीचे कार्य जाणून घेण्यासाठी डाॅ. कुमार हे चिंचोली गुरव येथे आले होते. त्यांना कंपनीचे अध्यक्ष विठ्ठल घोरपडे, व्यवस्थापकीय संचालक सुखलाल गांगवे यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. यावेळी कंपनीचे संचालक राजेंद्र सोनवणे, दिलीप सोनवणे, अशोक गडाख, डॉ. सुहास आभाळे, अजित मुंगसे, समाधान गुंजाळ, अण्णासाहेब गांगवे, सोमनाथ झिंजुर्डे उपस्थित होते.
...................
लॉकडाऊनला मानले संधी
कंपनीची स्थापना फेब्रुवारी २०२० मध्ये करण्यात आली. स्थापनेनंतर काहीच दिवसात कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना संघटित करुन अंडी विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कंपनीने एक वाहन विकत घेतले. या वाहनातून शेतकऱ्यांच्या पॉल्ट्री फार्मवरुन अंडी गोळा केली जात होती. ही अंडी मोठ्या शहरांमध्ये विकली गेली. आत्ताही अशाच पद्धतीने ही अंडी विकली जात आहेत. कंपनीचे तीनशेहून अधिक शेतकरी सभासद आहेत. हे सर्व शेतकरी दुष्काळी पट्ट्यातील आहेत. लॉकडाऊन काळात अंडी विक्रेत्यांपर्यंत पोहोचविणे मोठे आव्हान होते. अनेक व्यापारी कमी किमतीत अंडे खरेदी करीत होते. त्याचवेळी अफवा पसरल्यामुळे ग्राहकही अंडी विकत घेत नव्हते. अशा परिस्थितीत कंपनीने सर्व शेतकऱ्यांकडील अंडी गोळा केली अन् पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबादमधील व्यापाऱ्यांना विकली. कोरोनाच्या संकटाला संधी मानून कंपनीने काम केले. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे थेट ऑनलाईनद्वारे खात्यावर जमा करण्यात येतात, अशी माहिती गांगवे यांनी दिली.
...............
शेतकऱ्यांचा फायदा
कोंबडी खाद्य एकत्रित खरेदी केल्याने पैसे वाचतात. व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टळते. अनेकदा व्यापारी कोणतेही कारण सांगून कमी किमतीत अंडी खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. मात्र, आता शेतकऱ्यांनी संघटित होऊन अंडी विक्री सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला फायदा झाला, असे गांगवे यांनी सांगितले.