श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : केंद्रीय मंत्री रामदास आठवले व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईत झालेल्या चर्चेनंतर शिर्डी व नगर दक्षिण मतदारसंघातील रिपाइंच्या कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रिय होण्याचे आदेश मिळाले आहेत. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत रिपाइंला प्रतिनिधीत्व देण्याचे दोन्ही नेत्यांच्या बैठकीत निश्चित झाले.
शिर्डी मतदारसंघातून मंत्री आठवले यांनी मागणी करूनही त्यांना उमेदवारी डावलण्यात आली होती. त्यामुळे आठवलेंसह त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले होते. कार्यकर्त्यांनी शिर्डी व नगर दक्षिणमध्ये बैठका घेऊन बंडाचा इशारा दिला होता. महायुतीच्या उमेदवारांविरूद्ध उमेदवार देण्याचा निर्णय झाला होता. तेव्हापासून रिपाइंचे कार्यकर्ते प्रचारापासून दूर होते. मात्र गुरुवारी विखे पाटील व आठवले यांच्यात मुंबईत चर्चा झाली. यावेळी रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष विजय वाकचौरे, भिमा बागुल, जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, सुनील साळवे, श्रीकांत भालेराव, राजाभाऊ कापसे, बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.