अहमदनगर : भविष्य निर्वाह निधीची तब्बल ३७ लाखांची रक्कम शिक्षकांच्या खात्यात वर्ग करण्याऐवजी ती दुसऱ्याच खात्यात वर्ग झाल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अर्थ विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी सुशील विधाते असे कारवाई झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मागील महिन्यात शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीची ३७ लाखांची रक्कम कर्मचारी विधाते यांच्याकडून चुकीच्या खात्यात वर्ग झाली. ही बाब प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) मंगल वराडे यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी अधिक माहिती घेतली असता, ही रक्कम यापूर्वीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी पी. एन. वानखेडे यांच्या खात्यावर वर्ग झाली होती. वराडे यांनी तातडीने वानखेडे यांना कळवून ही रक्कम परत अर्थ विभागाच्या खात्यात वर्ग करून घेतली. परंतु, कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा झाल्याने त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्याकडे पाठविण्यात आला. सीईओ क्षीरसागर यांनी संबंधित प्रकरणात निष्काळजीपणा आढळल्याने कर्मचारी विधाते यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी अर्थ विभागाकडून सुरू आहे. संबंधित कर्मचाऱ्याकडून चुकीने ही रक्कम वर्ग झाली की यामागे आणखी काही कारण आहे, याची चौकशी सुरू आहे.
मागील महिन्यात कनिष्ठ लेखाधिकारी कर्मचाऱ्याकडून ३७ लाखांची रक्कम दुसऱ्याच खात्यात वर्ग झाली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीने ही रक्कम पुन्हा मागे घेतली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तोपर्यंत संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.
- मंगल वराडे, प्रभारी कॅफो