श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्य सरकारच्या महसूल विभागाने आणलेल्या नवीन धोरणानुसार मिळणाऱ्या ६०० रुपये ब्रास वाळूच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात तोबा गर्दी पाहायला मिळत आहे; मात्र चार-पाच दिवसांपासून रांगेत उभे राहूनही अनेकांची वाळूसाठी नोंदणी होऊ शकली नाही. मोबाईलवर ओटीपी मिळत नसल्यामुळे अनेकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे. मोठी प्रतीक्षा करूनही वाळू मिळत नसल्याने रोज नागरिकांना रिकाम्या हाती माघारी परतावे लागत आहे.
श्रीरामपूर तालुक्यात नव्याने वांगी व एकलहरे येथे शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात आले आहेत. महसूल विभागाने नुकतेच या दोन्ही केंद्रांचे उद्घाटन केले होते. तत्पूर्वी मात्र अनेक दिवसांपासून नागरिकांना वाळू मिळत नव्हती. त्यामुळे बांधकामांची कामे ठप्प झाली होती. तहसील कार्यालयात वाळूच्या दोन्ही केंद्रांवरून बांधकामासाठी वाळूची विक्री सुरू होताच लाभार्थींची मोठी गर्दी उसळली आहे. चार दिवसांपासून लोकांची रांग असून अनेकांना माघारी परतावे लागत आहे.
उक्कलगाव येथील विनायक तांबे यांनी आपण चार दिवसांपासून शेतीची कामे सोडून तहसीलमध्ये येतो; मात्र दिवसभरात खूप कमी लोकांचे चलन भरले जाते. त्यामुळे माघारी जावे लागते. ६०० रुपये ब्रास वाळूसाठी दररोज पाचशे रुपयांचे नुकसान होत आहे. कामे सोडून दररोज श्रीरामपुरात यावे लागते, त्याचा खर्च वेगळाच, असे तांबे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.