शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यासह शिर्डीला जोडणा-या रस्त्यांसाठी साडेआठ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शिर्डीत दिली.रविवारी गडकरी यांनी माध्यान्ह आरतीला हजेरी लावत मंदिरात साईबाबांचे दर्शन घेतले. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री राम शिंदे, आमदार स्नेहलता कोल्हे, साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे आदी यावेळी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले, साई शताब्दीनिमित्त देश-विदेशातील भाविक येतील. देशातील शेतकरी, मजूर, जनता सुख-समृद्धीने नांदावी, अशी साईचरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. राज्य व केंद्र सरकारने शिर्डीत विमानतळ उभारल्याने साई भक्तांची गैरसोय दूर झाली, असेही गडकरी म्हणाले. गडकरी यांनी साईनाथ रक्तपेढीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास भेट दिली. संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, नगरसेवक शिवाजी गोंदकर, डॉ. राजेंद्र पिपाडा, राहात्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार माणिक आहेर आदी उपस्थित होते.
शिर्डीला जोडणा-या रस्त्यांसाठी साडेआठ हजार कोटी - नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 4:01 PM