लोकमत न्यूज नेटवर्क, शिवाजी पवार, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): सराला बेट येथील गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचा सोहळा पाहून प्रभावित झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे भेट देण्याची व्यक्त केलेली इच्छा गुरुवारी पूर्ण झाली. संघाच्या अखिल भारतीय ग्रामविकास अभ्यासवर्गाचे बेटावरील आयोजन त्यासाठी निमित्त ठरले.
सरसंघचालक मोहन भागवत हे दोन दिवसांच्या सराला बेट दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी जालना येथून त्यांचे दुपारी आगमन झाले. सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थान, गोदावरी धाम येथे संघाचा ग्रामविकास अभ्यासवर्ग होत आहे. त्यासाठी देशभरातून ३५० कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यात ५० महिला व ३०० पुरुषांचा समावेश आहे. राज्यातील प्रमुख देवस्थानांचे २० महंत यावेळी उपस्थित होते. मोहन भागवत यांनी त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा केल्याची माहिती मिळाली.
भारतातील ४५ प्रांतातून ३५० जण या अभ्यासवर्गात ग्रामीण विकासाच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, भागय्याजी, ग्रामविकास संयोजक डॉ. दिनेश उपस्थित आहेत.
सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या सप्ताहाचे दरवर्षी आयोजन केले जाते. प्रत्येक वर्षी सप्ताहाचे आयोजन स्थळ बदलले जाते. त्यासाठी विविध भागातील आयोजक सप्ताहाचा नारळ उचलतात. आयोजक बदलले, तरीही भाविकांच्या गर्दीचा नवा उच्चांक पाहायला मिळतो. अशाच एका सप्ताह वेळी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. त्यावेळी गोदावरी नदीकाठच्या सराला बेट येथील सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थानला भेट देण्याची इच्छा मोहन भागवत यांनी व्यक्त केली होती. संस्थानचे मठाधिपती यांनी मंगळवारी पत्रकारांना ही माहिती दिली होती. राज्यातील आध्यात्मिक क्षेत्रातील येणाऱ्या अडचणींवर महंतांशी भागवत यावेळी चर्चा करणार आहेत.