लोणी -ऊस तोडणी मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी शासनाने तयार केलेली नियमावली ही अतिशय किचकट आणि प्रशासकीय स्तरावर वेळकाढुपणाची ठरणार असल्याने हे परिपत्रक मागे घ्यावे, आणि ऊस तोडणी मजुरांची आहे त्याच ठिकाणी वैद्यकीय तपासणी करुन एस.टी महामंडळाच्या गाड्यांमधुन त्यांना गावी सुरक्षित पोहचविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.
या संदर्भात विखे पाटील म्हणाले की, मागील गळीत हंगामासाठी गेलेल्या ऊस तोडणी मजुरांना कोरोनाच्या संकटामुळे आहे त्याच ठिकाणी अडकुन पडावे लागले आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमिवर ऊस तोडणी मजुरांपुढील समस्याही वाढत गेल्या आहेत. यासाठी शासनाने ऊस तोडणी मजुरांच्या संदर्भात निर्णय करावा अशी मागणी आपण यापुर्वीच केली होती. परंतू याबाबत राज्य सरकारने निर्णय केला असला तरी, ऊस तोडणी मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्याबाबत सरकारने तयार केलेली नियमावली अतिशय किचकट आणि विलंबांची ठरणार असल्यामुळे ऊस तोडणी मजुरांना त्यांच्या गावी पोहचण्यास मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली.
याबाबत साखर आयुक्त कार्यालयाने काढलेल्या पत्रकाचा हवाला देवून आ.विखे पाटील म्हणाले की, ऊस तोडणी मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्या संदर्भात प्रस्ताव तयार करण्यापासुन ते या मजुरांना पोहचविण्यासाठी वाहतुक परवाने मिळविण्याबाबतची किचकट प्रक्रीया पाहाता ऊस तोडणी मजुर त्यांच्या गावी पोहचणार कधी असा सवाल आ.विखे पाटील यांनी उपस्थित केला.
गेल्या अनेक महीन्यांपासुन ऊस तोडणी कामगार आपल्या गावापासुन आणि कुटुंबापासुन दुर राहत आहेत. तसेच त्यांची शेती पावसावर अवलंबुन असल्यामुळे खरीप हंगाम जवळ आला असल्याने शेतातील पुर्व मशागतीची कामे करण्यासाठी यासर्व ऊसतोडणी मजुरांना त्यांच्या गावी जाणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट करुन आ.विखे पाटील यांनी सांगितले की, मागील गळीत हंगाम संपल्यानंतरही कोरोनाच्या आपत्तीमुळे ऊस तोडणी मजुर आहे त्याच ठिकाणी अडकुन पडले आहेत. प्रशासकीय बाबींमुळे त्यांना गावी पोहचणे शक्य होणार नसेल तर शासन निर्णय होवून उपयोग काय? यासाठी ऊस तोडणी कामगारांची आहे त्याच ठिकाणी वैद्यकीय तपासणी करुन एस.टी महामंडळाच्या बस मधुन त्यांच्या संबधित गावी सुरक्षित पोहचविण्याची व्यवस्था करण्याबाबत सरकारने विचार करावा. सरकारच्या आदेशाप्रमाणे मजुर वाहतुक करताना सोशल डिस्टंसिंग पाळण्याबाबतच्या सुचना केल्या असुन याची अंमलबजावणी एस.टी बस मधुनच होवू शकते याकडे आ.विखे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
परिवहन विभागाची राज्यातील सर्व वाहतुक सध्या बंद असल्यामुळे एस.टी बसचा उपयोग ऊस तोडणी मजुरांना पोहचविण्यासाठी योग्य होईल. संबधित तालुक्यांच्या स्थानिक प्रशासनावर यासर्व ऊस तोडणी मजुरांचा तपासणी अहवाल तयार करण्याची जबाबदारी द्यावी असेही आ.विखे पाटील यांनी सुचित करताना ऊस तोडणी मजुरांचे स्थलांतरण शासकीय यंत्रणेतुनच सुरक्षित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.