अहमदनगर : कोरेानावरील लस घेण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, अनेकांकडे मोबाइल नाहीत. तसेच काहींना मोबाइल हाताळता येत नाही. त्यामुळे लसीकरणात अडथळे येत असून, नियम शिथिल करून केंद्रावरच ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून दिली आहे. ही लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. परंतु, त्यामुळे अनेक अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी लसीकरणासाठीचे काही नियम शिथिल करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. यामध्ये जगताप यांनी म्हटले आहे की, कोरोनावरील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे. लस घेण्यासाठी नागरिक रांगा लावत आहेत. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे नागरिक लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ही तांत्रिक अडचण केंद्र सरकारच्या नियमांमुळे निर्माण होत आहे. कारण १८ ते ४४ वयोगटातील अनेक नागरिक अशिक्षित आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांकडे साधे फाेनदेखील नाहीत. त्यामुळे त्यांना ऑनलाइन नोंदणी करता येत नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या लसीकरणाबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा करणे आवश्यक असून, याबाबत केंद्र शासनाशी पत्रव्यवहार करून नियमांत शिथिलता आणण्याबाबत सूचना करावी, असे जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.