तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील वडझरी बुद्रुक शिवारातून तळेगाव दिघे -लोणी रस्त्याने चालेल्या कारने अचानक पेट घेतला. काही क्षणात कार खाक झाली. वाहन चालक सावध असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यात अंदाजे पाच ते सहा लाखाचे नुकसान झाले. शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.तळेगाव दिघे-लोणी रस्त्याने कारमधून (एम. एच. १६, क्यू ९९३५) विजय भागवत बनकर (वाहन मालक, रा. बनकर वस्ती, राहाता) व चालक सतीश बाबूराव विदुर (रा. सावळी विहीर) हे दोघे लोणीच्या दिशेने प्रवास करीत होते. वडझरी बुद्रुक शिवारातील जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांच्या फार्म हाउससमोरील रस्त्यावर कारने अचानक पेट घेतला. काही क्षणातच कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. विजय बनकर व सतीश विदुर यांनी तात्काळ वाहनातून बाहेर उड्या मारल्याने दोघेही बचावले. कारला आग लागल्याचे रस्त्याने चाललेल्या अन्य वाहन चालकांनी तळेगाव दिघे येथे सांगितले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन स्थानिक रहिवाशांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत वाहन जळून राख झाले. गाडीला आग नेमकी कशामुळे लागली? याचे निश्चित कारण समजू शकले नाही, असे तळेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार बाबा खेडकर यांनी सांगितले. कार जळीतप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नसल्याने सांगण्यात आले.