तिसगाव केंद्राला लवकरच ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा
लोकमत न्यूज नेटवर्कतिसगाव : तिसगाव (ता.पाथर्डी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळणार आहे. त्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे दीड वर्षापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला लवकरच यश येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे यांनी दिली.
आठरे म्हणाल्या, तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रूग्णालयाचा उन्नती दर्जा मिळावा यासाठी दोन वर्षांपूर्वीच आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्ताव दिला होता. परंतु, या प्रस्तावासोबत जिल्हा नियोजनच्या ठरावाची प्रत जोडावी, अशी त्रृटी काढण्यात आली होती. त्यानंतर वर्षभर कोविड संसर्गामुळे जिल्हा नियोजनची बैठक झाली नाही. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला उप जिल्हा रूग्णालयाचा उन्नती दर्जा मिळावा, अशी मागणी केल्याचे आठरे यांनी सांगितले.
---
तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सव्वाकोटी रूपये खर्च करून नर्सिंग ट्रेनिंग सेंटरसाठी बांधण्यात आलेली इमारत अनेक दिवसांपासून नर्सिंगच्या प्रतीक्षेत उभी आहे त्या ठिकाणीही लवकरच नर्सिंग सेंटर सुरू केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
-संध्या आठरे,
जिल्हा परिषद सदस्या, तिसगाव
फोटो ०८ आठरे
जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विविध मागण्यांचे निवेदन नगर येथे दिले.