नानासाहेब जठारविसापूर : दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याने जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पण विसापूर (ता.श्रीगोंदा ) येथे जनावरांची छावणी सुरू करण्यासाठी कोणत्याही सामाजिक संस्थेने अथवा व्यक्तींनी प्रस्ताव दाखल करण्यास उत्सुकता दाखविली नाही. त्यामुळे जनावरांची छावणी सुरू होऊ न शकल्यामुळे विसापूरमधील जनावरांची ससेहोलपट सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव जवळच्या छावण्यांची वाट या जनावरांना दाखवावी लागत आहे.पशुवैद्यकीय विभागाच्या पिंपळगाव पिसा कार्यालयाकडे विसापूर येथे ७२४ मोठी व २४२ लहान अशा एकूण ९६६ जनावरांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे शेजारी असणाºया कोरेगव्हाण, सुरेगाव, चांभुर्डी, उखलगाव व कोळगाव (लगडवाडी) येथील छावण्यांमध्ये सोयीनुसार स्थलांतरित केले आहेत. मुंगूसगाव येथेही लहान मोठे ५४८ जनावरे आहेत. मात्र तेथेही जनावरांची छावणी न झाल्याने शेतकऱ्यांनी आपली जनावरे इतरत्र स्थलांतरित केले आहेत.शेतकºयांना आपल्या गावात छावणी नसल्यामुळे दुसºया गावांमधील छावणीचा आश्रय घेऊन आपले गोधन वाचविण्यासाठी धडपड करावी लागते आहे. दुसºया गावातील छावणीत राहून जनावरांचे संगोपन करण्यात अडचणी येत आहेत. जनावरांच्या संगोपनासाठी किमान कुटुंबातील एका व्यक्तीला छावणीत मुक्काम करावा लागतो. त्यामुळे चार पाच किलोमीटर अंतरावर छावणीवर राहताना कुटुंबाची काळजी घेताना जेवणासाठी दररोज दोन वेळा घरी हेलपाटे मारावे लागतात. मोटारसायकल नसल्यास जेवायला मोठी पायपीट करावी लागते.ज्या शेतकºयांची जनावरे छावणीत जाऊ शकत नाहीत, त्यांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही लोकांना मजुरी केल्याविना गत्यंत्तर नाही. मग त्यांनी आपली जनावरे छावणीत घेऊन जायची कशी? असा प्रश्न विचारला जात आहे. ज्या जनावरांची पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी आहे, मात्र ती छावणीत दाखल झालेली नाहीत, अशा जनावरांचे अनुदान थेट अशा शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करावे अथवा गोठ्यात चारा पुरविण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी पशुपालकांकडून केली जात आहे.