Russia-Ukraine War:युक्रेनमधून दोघे सुखरूप परतले, आईने केलं स्वागत तर नगरसेवकाकडून सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 11:52 PM2022-02-27T23:52:24+5:302022-02-27T23:58:19+5:30

Russia-Ukraine War: इतर विद्यार्थीही परतीच्या मार्गावर

Russia-Ukraine War: After returning safely from Ukraine, Bharat was welcomed in Jallosha and the corporator was also present in ahmednagar | Russia-Ukraine War:युक्रेनमधून दोघे सुखरूप परतले, आईने केलं स्वागत तर नगरसेवकाकडून सत्कार

Russia-Ukraine War:युक्रेनमधून दोघे सुखरूप परतले, आईने केलं स्वागत तर नगरसेवकाकडून सत्कार

अहमदनगर : युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेले नगरचे दोन विद्यार्थी सुखरूप घरी परतले असून, इतर विद्यार्थीही परतीच्या मार्गावर आहेत. युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी पुन्हा मायभूमीत परतू लागल्यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, युक्रेनमधून दोन विद्यार्थी परत आले आहेत. इतरही विद्यार्थी लवकरच परत येतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले.

नगर जिल्ह्यातील २५ विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. हे विद्यार्थी तेथील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र, युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यामुळे युक्रेनमधून बाहेर पडणे त्यांच्यासाठी मुश्कील झाले होते. भारतीय दूतावासामार्फत या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते. या सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था भारतीय दूतावासाने केली होती. रविवारी नगरचे दोन विद्यार्थी परत आले. यात भरत तोडमल व आविष्कार मुळे यांचा समावेश आहे. हे दोघेही चेर्नीव्हटसी येथील बुकोविनीयन स्टेट मेडिकल युनिर्व्हसिटीत एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. 

आविष्कारचे कुटुंब पुणे येथे स्थायिक असल्याने आविष्कार पुण्यात थांबला तर भरत नगरमध्ये दाखल झाला. नगरमध्ये येताच भरतचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्याच्यावर फुलांची उधळण करीत नातेवाईकांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नगरसेवक सुनील त्रिंबके, सोपान तोडमल, माणिक बनकर, प्रदीप देवचक्के, राजेंद्र निमसे, राजेंद्र सरोदे, बाळासाहेब शिंदे, प्रशांत मोरे, योगेश पिंपळे, गोविंद कदम, संजय मोकाटे, सुनीता मोकाटे, शीतल तोडमल, प्रीती मोकाटे, दीपा मोकाटे, ओंकार तोडमल, तिरुमल पासकंटी आदी उपस्थित होते.

असा झाला परतीचा प्रवास

शुक्रवारी बुकोविनीयन विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया बॉर्डरपर्यंत भारतीय दूतावासाच्या बसेसने सोडण्यात आले. तेथून रोमानियाची राजधानी बुकारेस्ट येथे विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले. बुकारेस्टमधून विमानाद्वारे सर्व विद्यार्थी शनिवारी रात्री ८ वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले. विद्यार्थ्यांचा सर्व प्रवास खर्च व इतर व्यवस्था भारतीय दूतावासाने केली होती, अशी माहिती भरत तोडमल याने लोकमतला दिली.

युक्रेन-रशिया युद्धामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. परंतु तसा आम्हाला फार काही त्रास झाला नाही. भारतीय दूतासावासाकडून आमची सर्व व्यवस्था करण्यात आली होती.
-भरत तोडमल, युक्रेनमधून परत आलेला विद्यार्थी

Web Title: Russia-Ukraine War: After returning safely from Ukraine, Bharat was welcomed in Jallosha and the corporator was also present in ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.