अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचे आयोजन यावेळी शिर्डी येथे कररण्यात आले आहे. शरद पवारांसह राष्ट्रवादीचे सर्वच दिग्गज नेते या शिबिराला उपस्थित असून आपले विचार मंचावरुन मांडत आहेत. शिर्डीतील हे शिबीर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त विधानाने चांगलेच गाजले. दरम्यान, शिबिराच्या पार्श्वभूमीवर शिर्डी दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शिर्डी साई मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही साईचरणी लीन होऊन प्रार्थना केली.
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही साईंचे दर्शन घेतले. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी मंदिरातील फोटोही शेअर केले आहेत. शरद पवार यांच्याबद्दल नेहमीच चर्चा होत असते, त्यांच्या आस्तिक आणि नास्तिक असण्यावरुन दोन मतप्रवाह आहेत. मात्र, शरद पवार यांनी लोकभावनेचा आदर करत आपली भूमिका नेहमीच विशद केली आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातीलही त्यांचे फोटो यापूर्वी व्हायरल झाले आहेत. आता, शिर्डीतील साई मंदिरात त्यांनी मुलगी सुप्रिया व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत दर्शन घेतले.
''श्री साई संस्थान, शिर्डी येथे भेट देऊन आदरणीय पवार साहेबांच्या सोबत साईबाबांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. याप्रसंगी महाराष्ट्रातील जनता सुखी असावी, शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे अशी श्री साईचरणी प्रार्थना केली. यावेळी साई संस्थानाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.'', अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियातून दिली.