अहमदनगर : महापालिकेतील बहुचर्चित पथदिवे घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी आता या कामाचा ठेकेदार सचिन सुरेश लोटके याला अटक केली आहे.महापालिकेतील पथदिवे घोटाळाप्रकरणी तोफखाना पोलिसांनी चारजणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यात या कामाचा ठेकेदार सचिन लोटके , विद्युत विभागाचा उपअभियंता आर. जी. सातपुते, निरीक्षक बाळासाहेब सावळे, लिपिक भरत काळे यांचा समावेश होता. आतापर्यंत पोलिसांनी लिपिक भरत काळे याला अटक केली होती. तर इतर सर्व फरार होते. या आरोपींचा पोलीस कसून शोध घेत असताना बुधवारी रात्री सचिन लोटके तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्वरित त्याला अटक केली.लोटके यास पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायाधीश बनकर यांनी त्यास ५ मार्चपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आता या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या दोन झाली असून, इतर दोघे फरार आहेत.
काय आहे प्रकरण
महापालिकेमार्फत शहरातील प्रभाग क्रमांक १ आणि २८ मध्ये ४० लाख रुपये खर्चाचे पथदिवे बसविण्याच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी २९ डिसेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत केला होता. त्यावर ३० डिसेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन चौकशी आणि दोषी अधिका-यांच्या निलंबनाची मागणी केली होती. आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे आणि सहायक नगररचना संचालक संतोष धोंगडे यांची चौकशी समिती नियुक्त केली. या चौकशीचा अहवाल दोन्ही अधिका-यांनी गत गुरुवारी आयुक्तांना सादर केला. त्या अहवालाचा अभ्यास करून आयुक्तांनी विद्युत विभागाचे प्रमुख सातपुते आणि सुपरवायझर सावळे यांना दोषी ठरवले आहे. चौकशी सुरू असतानाच या दोन्ही अधिका-यांना निलंबित करण्यात आले आहे.पथदिव्यांच्या चौकशी अहवालाबाबात आयुक्त मंगळे म्हणाले, पथदिव्यांच्या १९ कामात घोटाळा झाला आहे. मुख्य लेखा परीक्षक चंद्रकांत खरात, उपायुक्त (सामान्य) विक्रम दराडे, शहरअभियंता विलास सोनटक्के, विद्युत विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, सुपरवायझर बाळासाहेब सावळे, लेखा विभागातील लिपिक लोंढे, बिले तयार करणारा भरत काळे यांचे चौकशीदरम्यान जबाब घेण्यात आले.चौकशीचा अहवाल पोलिसांकडे सादर केला होता. त्यावर पोलिसांनी स्वत: अधिका-यांची चौकशी केली़ त्यानंतर पोलिसांनी स्वतंत्र चौकशीचा अहवाल सोमवारी दुपारी सादर केला. त्यानुसार आयुक्त मंगळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात विद्युत विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, सुपरवायझर बाळासाहेब सावळे, लिपिक भरत काळे, ठेकेदार सचिन लोटके यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तिस-याच दिवशी काढली बिले
दोन प्रभागांत पहिल्या दिवशी प्रस्ताव मंजूर, दुस-या दिवशी कामे पूर्ण आणि तिस-या दिवशी बिले काढण्यात आली. महापालिकेत सर्वांत वेगाने कामे पूर्ण झाल्याचे दिसते. या १९ कामांची वेगवेगळ्या तीन तारखांना कामे कशी झाली, याची सविस्तर माहिती अहवालात नमूद करण्यात आली आहे.