आॅनलाईन लोकमतकर्जत, दि़ ३ - शेतकऱ्यांच्या संपात फुट पाडण्यास जबाबदार असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व शेतकरी नेते जयाजीराव सुर्यवंशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे कुळधरण येथे दहन करण्यात आले. यावेळी त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच शेतकऱ्यांचा संप सुरू असल्याचे जाहीर करण्यात आले.राज्यातील शेतकरी गेल्या दोन दिवसांपासून संपावर गेले आहेत. यामुळे राज्य सरकार हादरले होते. मात्र राज्य सरकारने संपकरी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. यामध्ये फिक्सिंग झाले़ यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत. याला मंत्री सदाभाऊ खोत व शेतकरी संघटनेचे जयाजीराव सुर्यवंशी हे जबाबदार आहेत, असा आरोप करीत कुळधरण येथे शेतकऱ्यांनी आज खोत व सुर्यवंशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. संपुर्ण कर्जमुक्ती करावी, शेतीमालाला हमीभाव मिळावा या दोन प्रमुख मागण्या मान्य केल्या शिवाय हे आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असेही यावेळी शेतकऱ्यांनी जाहीर केले. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रिक, कुळधरणचे सरपंच अशोकराव जगताप, भाऊसाहेब सुपेकर, बंडु गुंड, संदीप सुपेकर, सुरेश खोडवे, बाळासाहेब सुपेकर, राहुल सुपेकर, राहुल जगताप आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सदाभाऊ खोत, जयाजी सुर्यवंशींचा पुतळा जाळला
By admin | Published: June 03, 2017 4:48 PM