अहमदनगर : दोन देश, पाच राज्य असा तीन हजार किलोमीटरचा प्रवास असणाऱ्या नगर-बांग्लादेश सद्भावना रॅलीच्या प्रवासाला शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.
नगर शहरातील भूईकोट किल्ला परिसरातून रॅलीला सुरूवात झाली. १०० सायकलस्वार या रॅलीत सहभागी झाले आहेत. भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व बांग्लादेश मुक्ती संग्रामाच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून स्नेहालय संस्थेच्या वतीने ागांधी जयंतीच्या निमित्ताने या सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी हजारे यांच्यासह ज्येष्ठ गांधीवादी नेते डाॅ. एस. एन. सुब्बाराव, पद्मश्री पोपटराव पवार, मेहेरबाबा ट्रस्टचे मेहेरनाथ कलचुरी आदी उपस्थित होते. अण्णा हजारे यांनी रॅलीला शुभेच्छा देताना तरूणांनी देशसेवेसाठी वाहून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. युवाशक्ती जागृत झाली तर देशाचे भवितव्य उज्जल ठरेल. जीवनात ध्येय ठरवल्याशिवाय उद्दिष्टापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे तरूणांनी गावाची, समाजाची, देशाची सेवा करण्याचे ध्येय ठेवून काम करावे, असे ते म्हणाले.
पवार म्हणाले की, भारत जोडो अभियान या रॅलीतून अधिक सक्षम होईल. तरूणांनी, विशेषता महाविद्यालयीन मुलांनी यात घेतलेला सहभाग उल्लेखनीय आहे. सुब्बाराव यांनी भारतीय स्वातंत्र्यचळवळीचे दाखले देत बांग्लादेशाच्या स्वातंत्र्याचा आढावा घेतला. महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या बळावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. जे मागील दोन हजार वर्षांत झाले नाही, ते गांधीजींनी अहिंसेतून करून दाखवले. त्यामुळे त्यांचा वसा, प्रेरणा तरूणांनी घेऊन देश व समाजमन जोडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे ते म्हणाले. सुब्बाराव यांनी गायलेल्या क्रांतीगिताने रॅलीतील सायकलस्वारांना संदेश देण्यात आला. यात्रेत पेमराज सारडा महाविद्यालयाच्या एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, तसेच हिवरेबाजारचे विद्यार्थी सहभागी झाले होते. स्नेहालयचे अध्यक्ष संजय गुगळे यांनी आभार मानले. ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
---------------
या यात्रेत १०० सायकलस्वार नगरमधून सहभागी झाले. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, पश्चिम बंगाल व बांग्लादेशातून सुमारे ३ हजार किमीचा प्रवास ही रॅली करणार आहे. रस्त्यामध्येही काही स्वयंसेवी या रॅलीत सहभागी होणार आहेत. दोन देशांत, तसेच समाजासमाजात मैत्री आणि सद्वाव वाढविण्यासाठी ही यात्रा आहे.
----------------
फोटो - ०२सद्भावना रॅली
तीन हजार किलोमीटरचा प्रवास असणाऱ्या नगर-बांग्लादेश सद्भावना रॅलीच्या प्रवासाला शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, एस. एन. सुब्बाराव, पोपटराव पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला.