सुपा : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी विविध सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली असल्याने पारनेर तालुक्यातील रायतळे येथील सद्गुरू शांतानंद बाबा यांची पुण्यतिथी सोहळा आनंदाश्रमावर साजरा न करता साधक, भाविक यांनी आपापल्या घरीच साजरा केला.
सालाबादप्रमाणे बह्मलीन सद्गुरू शांतानंद बाबा यांची पुण्यतिथी बुधवारी (दि. १८) तेे शनिवारी (दि. २०) या कालावधीत होता. पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मिरवणूक त्यातील विविधता व भव्यता लक्षवेधी असते. यावेळी हजारो भाविक, साधक उपस्थित राहतात. विविध सामाजिक, आरोग्य विषयक, शेती, पशुपालन, दुग्ध उत्पादन असे शेतकऱ्यांशी निगडित कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे संतसेवक महादेव महाराज काळे यांनी सांगितले. याबाबत सद्गुरु शांतानंद महाराज चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे महादेव महाराज काळे यांनी भाविक, साधक यांना निवेदनाद्वारे घरीच सोहळा साजरा करण्याचे आवाहन केले होते.