अहमदनगर : जैन धर्मातील साधु - संताना आधारकार्डाविना लसीकरण करण्याची केंद्र सरकारने विशेष परवानगी दिली आहे, अशी माहिती गुजराती समाज महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र शहा यांनी पत्रकान्वये दिली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघातर्फे जैन धर्मीय साधु- साध्वी समुदायासह सर्व धर्मीय साधु समुदायाला कोविड लसीकरण करण्यासंदर्भात राज्यपाल, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य राज्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेता यांना गुजराती समाज महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र शहा यांनी ई मेलवर निवेदन पाठवले होते. तसेच आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली होती. अल्पसंख्याक समितीचे उप-प्रमुख यश प्रमोद शहा यांनी राज्यपाल, आरोग्य विभाग मंत्रालय यांच्याबरोबर फोनवरून बोलणे केले होते.
त्यानुसार या विषयावर त्वरित निर्णय घेण्यासाठी राज्यपाल महोदयांनी आरोग्य विभागास आदेश दिले हाेते. तसेच केंद्र शासनास या अडचणींबाबत कळवले होते. आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांनी केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर केंद्र शासनाने लसीकरणाबाबत सुधारित आदेश काढले आहेत.
या आदेशानुसार राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना तशा सूचना जारी केल्या आहेत. मंत्रालयातून फोनद्वारा तथा ईमेलद्वारे गुजराती समाज महासंघ अल्पसंख्याक समिती उपप्रमुख यश शहा यांना कळवले आहे. यामुळे आता साधु संतांचे लसीकरण करणे शक्य झाले आहे. गुजराती समाज महासंघाच्या वतीने सर्वांचे आभार मानले आहेत.