अहमदनगर : शेतकरी आत्महत्येची समस्या सोडविण्यासाठी सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्याने शासनाला उपाययोजना सुचविल्या. मात्र उपाय-योजनांवर विचार होण्याऐवजी त्या अधिका-याचीच पेन्शन सरकारने वाढवली. त्यामुळे सेवानिवृत्त शिवाजी वाघ व्यथित झाले. त्यांनी वाढीव पेन्शनची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविली आहे.पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील शिवाजी पांडुरंग वाघ हे शेतकरी कुटुंबातील आहेत. ते कृषी विभागातून निवृत्त झाले. अनेक दिवसांपासून शेतकरी आत्महत्या हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. या समस्येचे कारण आणि त्यावरील उपाय त्यांनी शोधले. या उपायाचे पत्र वाघ यांनी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री व विविध पक्षांना रजिस्टर पोस्टाने पाठविले. पण या प्रस्तावाची दुर्दैवाने कोणीच दखल घेतली नाही. त्यानंतर वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या उपायांचा प्रस्ताव सादर केला. पुढील कार्यवाहीसाठी आपला प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे पाठविल्याचे उत्तर वाघ यांना मिळाले होते. त्यानंतर यावर विचार न होता वाघ यांच्या पेन्शनमध्ये दोन हजार रुपयांची वाढ सरकारने केली.पर्याय १ : बेरोजगारीवर होणारा खर्च थांबवून तो पैसा शेतकरी पेन्शनसाठी वापरावा.पर्याय २ : शेतकरी कुटुंबातील एखादी व्यक्ती नोकरीला असेल तर पगारातील १० टक्के रक्कम आई-वडिलांच्या खात्यावर जमा करावी़ उर्वरित शेतक-यांना प्रतिमहिना ३ हजार रुपये पेन्शन द्यावी, अशी उपाययोजना वाघ यांनी सुचविली होती.माझ्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार झाला नाही. उलट मलाच पेन्शन वाढवून आल्यामुळे दु:ख झाले. वाढवून आलेली पेन्शन पंतप्रधानांना पाठवित आहे. महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव मंजूर करण्याच्या कामासाठी माझी वाढीव पेन्शन खर्च करावी. - शिवाजी वाघ, सेवानिवृत्त कर्मचारी
पेन्शन वाढून आल्याचं झालं दु:ख : सेवानिवृत्त कर्मचा-याची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:48 AM