Shalini Vikhe Patil : माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या कार्यक्रमात भाजप नेत्याने अश्लाघ्य भाषेत माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर टीका केली. जयश्री थोरात यांच्याबाबत केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा महाराष्ट्रभरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. जयश्री थोरातांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचे वातावरण आहे. कार्यक्रमानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. तसेच गाडी पेटवण्यात देखील आली. यावरुन आता सुजय विखे आणि त्यांच्या मातोश्री शालिनी विखे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हा सगळा सुजय विखे यांना मारण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचे शालिनी विखे यांनी म्हटलं आहे.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात सुजय विखे यांनी युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात जयश्री थोरात यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली. सुजय विखे मंचावर असतानाच ते जयश्री थोरात यांच्याबद्दल अपमानास्पद शब्दांत टीका करत होते. वसंतराव देशमुख्यांच्या वक्तव्यामुळे संगमनेर तालुक्यात तणाव निर्माण झाला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते व थोरात समर्थकांनी सुजय विखेंचे बॅनर फाडून आणि त्यांच्या गाड्या फोडून निषेध व्यक्त केला.
कालच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून हा सुजय विखे विरोधात जीवे मारण्याचा पूर्व नियोजित कट होता, अशी प्रतिक्रिया शालिनी विखे पाटील यांनी दिली आहे. तसेच वसंतराव देशमुख यांच्या चुकीच्या वक्तव्याचा आपण निषेध केलेलाच आहे. पण सुजय विखेसुद्धा मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही, जशेस तसे उत्तर देईल, असंही शालिनी विखे म्हणाल्या.
"वसंतराव देशमुख यांनी वापरलेल्या शब्दांचा एक महिला म्हणून आणि ग्रामस्थ म्हणून आम्ही निषेध करतो. कोणाची जरी मुलगी असली तरी असं वाक्य कोणतीही महिला सहन करू शकत नाही आणि असं बोलण्याचाही अधिकार कोणाला नाही. कोणीही पातळी सोडून अशी वक्तव्य करू नये. प्रत्येकाच्या कुटुंबातील प्रश्न जो तो सोडवत असतो. पण खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी जे भाषण केलेय ते सुद्धा आमच्याकडे रेकॉर्ड आहे. सहनशीलतेला सुद्धा काहीतरी अंत असतो. आपल्या मुलाच्या तोंडून एकही वाक्य चुकीचे जाऊ नये असे संस्कार आम्ही दिलेले आहेत. डोक्यावर पडला म्हणून आरोप करतात. त्यामुळे आपण भाषण करताना काय तारतम्य बाळगलेलं आहे याचाही विचार केला पाहिजे. ते जर खालच्या पातळीवर बोलत असतील तर सुजय विखे मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही, जशास तसं उत्तर देईल. कुणीही बांगड्या भरलेल्या नाही," असं शालिनी विखे पाटील यांनी म्हटलं.
"हा सुजय विखेंना जीवे मारण्याचा पूर्व नियोजित कट होता हे काल दिसून आलं आहे. यांच्या गाड्यांमध्ये काठ्या होत्या, हे पोलिसांना समजलं आहे. कुणी गाड्या जाळल्या? कोण-कोण होतं हे सगळं पोलिसांना माहिती आहे. आमच्या युवकांना झालेली मारहाण ही चुकीची आहे. राजकारण करताना कोणीही एवढ्या खालच्या पातळीला जाऊ नये. विकासाच्या मुद्द्यावर उत्तर देण्याऐवजी तो डोक्यावर पडलाय हे बोलणं कितपत योग्य आहे. सुजयच्या भाषणातून कोणतीही अशी टीका झालेली नाही. कालची घटना पूर्व नियोजित कट होता. खालच्या पातळीवर जाऊन जे राजकारण सुरू आहे ते बंद करावे," असेही शालिनी विखे म्हणाल्या.