ई-पास असल्याशिवाय जिल्हांतर्गत तसेच जिल्ह्याच्या बाहेर जाता येणार नाही, असे शासनाचे आदेश आहेत. कोरोना मात्र अनेकांवर अचानक घाला घालत आहे. अशा वेळी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दखल करणे गरजेचे असते. ई-पास मिळण्यासाठी ऑनलाइन अप्लिकेशन केल्यानंतर किमान 24 तास लागतात. बहुतांशी जणांकडे ॲप्लिकेशन करण्यासाठी आवश्यक ते वैद्यकीय कागदपत्र उपलब्ध नसतात, अशा परिस्थितीत थांबून राहणे संयुक्तिक ठरत नाही. तपासणी नाक्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचारी मात्र तात्काळ परिस्थिती लक्षात घेत अत्यावश्यक गरज असलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी देत आहेत. मात्र, जे विनाकारण किंवा शुल्लक कारणांसाठी शहरात जाण्याचा प्रयत्न करतात अशांना मागे पाठवून दिले जाते किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
........
आडमार्गाने जाणाऱ्यांवर नजर
तपासणी नाक्यावर पोलिसांनी अडविले तर काही हुल्लडबाजी आडमार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांवर पोलीस नजर ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच असे विनाकारण फिरणारे शहरात जरी आले तरी ते पोलिसांच्या नजरेतून सुटत नाहीत.
............
बाहेरील जिल्ह्यातून येणारे व जिल्ह्यातून बाहेर जाणारे ९० टक्के लोक हे वैद्यकीय कारणासाठी प्रवास करतात. प्रत्येक रुग्णाला वेळेवर उपचार मिळणे गरजेचे असते. अशा वेळी मेडिकल इमर्जन्सी लक्षात घेत अडविले जात नाही. मात्र, जे विनाकारण फिरताना आढळून येतात त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
-सोपान गोरे, पोलीस उपनिरीक्षक, शेवगाव चेक नाका
.............
अत्यावश्यक सेवांना परवानगी आहे तसेच सध्या प्रवास करणारे बहुतांशी जण हे हॉस्पिटलच्या कामानिमित्त जातात. परिस्थिती पाहून अशा लोकांना परवानगी दिली जाते. विनाकारण प्रवास करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे.
-संभाजी वाबळे, कॉन्स्टेबल, राशीन चेक नाका
..........
जिल्ह्यात येथे आहेत तपासणी नाके
जामखेड- साकत फाटा, खर्डा चौक
कोपरगाव- झगडे फाटा
कोपरगाव तालुका- पुणतांबा चौफुली
संगमनेर तालुका- हिवरगाव पावसा टोल नाका
नेवासा- प्रवारासंगम संगम
शेवगाव- नित्यसेवा चौक
पाथर्डी- माणिकदौंडी चौक
कर्जत- पाटेवाडी, राशीन
बेलवंडी- गव्हाणवाडी
पारनेर- टाकळी ढोकेश्वर
श्रीगोंदा- काष्टी
श्रीरामपूर शहर- शिवाजी चौक
या नाक्यांवर एकूण ७० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे.
.................
टोल नाक्यावर वाहनांची तपासणी
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे तपासणी नाका कार्यान्वित आहे. इतर राज्यांतून, जिल्ह्यांतून येणाऱ्या वाहन चालकांकडे ई-पासबाबत विचारणा करण्यात येते. अत्यावश्यक कारण नसणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जात आहे.
---------------
ई-पास तातडीने काढणे शक्य नाही
संगमनेर तालुक्याला लागूनच नाशिक व पुणे या दोन जिल्ह्यांच्या सीमा आहेत. नाशिक, पुणे, धुळे आदी जिल्ह्यांतील कोरोनाची लागण झालेले रुग्ण संगमनेरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. अनेकदा रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने रुग्णांचे नातेवाईक रुग्णांना खासगी वाहनाने उपचारांसाठी घेऊन जातात. रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत याकरिता त्यांची धावपळ सुरू असते. अशावेळी आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेला ई-पास तातडीने काढणे शक्य होत नाही.