पाथर्डी : तालुक्यातील सोनोशी येथील साहित्यिक शिक्षक डॉ. कैलास दौंड यांनी लिहिलेल्या ‘माझे गाणे आनंदाचे’ या बालकविता संग्रहाला अमरावतीच्या स्व. सूर्यकांतादेवी पोटे चॅरिटेबल ट्रस्टचा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.
हा बालकविता संग्रह २०२०मध्ये प्रकाशित झाला आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून, त्याचे गुरुवारी रामचंद्र पोटे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध समीक्षक किशोर सानप उपस्थित होते. आमदार संजय पोटे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे.
डॉ. कैलास दौंड यांची कादंबरी, कविता संग्रह आणि इतर साहित्य प्रकारातील बारा पुस्तके प्रकाशित आहेत. त्यातील काहींचा विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. त्यांची ‘गोधडी’ ही कविता इयत्ता आठवीच्या बालभारती पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहे. दौंड यांचा माझे गाणे आनंदाचे हा पहिलाच बालकविता संग्रह आहे. या पुरस्काराबद्दल दौंड यांचे डॉ. सुदाम राठोड, कीर्ती काळमेघ वनकर, धनंजय गुडसुरकर, सुरेंद्र पाटील, डॉ. काशिनाथ बऱ्हाटे, डॉ. दत्तात्रय डुंबरे, डॉ. प्रल्हाद वावरे, एकनाथ आव्हाड, प्रल्हाद लुलेकर, अनुपमा उजगरे आदींनी अभिनंदन केले.