लोकमत न्यूज नेटवर्क
अण्णा नवथर
अहमदनगर : मागील वर्षीची शेतकऱ्यांची देणी न दिल्याने भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांचा श्रीगोंदा तालुक्यातील साईकृपा-२ साखर कारखाना, तर स्व. डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बंदच आहे. पाचपुते यांच्या अधिपत्याखालील साईकृपा-२ कारखान्यात थकीत वसुलीसाठी जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे.
नगर जिल्ह्यात एकूण २३ साखर कारखाने आहेत. यापैकी सहकारी साखर कारखान्यांची संख्या १४ असून, खाजगी साखर कारखाने ९ आहेत; परंतु चालू वर्षी २१ साखर कारखान्यांनीच गाळप सुरू केले आहे. सदर कारखान्यांनी ४४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. जिल्ह्यातील साईकृपा-२ व राहुरीचा तनपुरे हे दोन्ही कारखाने बंद आहेत. साईकृपा- २ साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ७ कोटी, तर तनपुरे कारखान्याने २ कोटी ३८ लाख रुपये थकविले आहेत. भाजपाचे आमदार पाचपुते यांच्या अधिपत्याखालील साईकृपा -२ साखर कारखान्याकडील थकीत वसुलीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक जिल्हा नियोजन भवनात झाली. या बैठकीत शेतकऱ्यांनी थकीत रक्कम देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी साईकृपा-२ साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्याचा आदेश दिला. खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अधिपत्याखालील तनपुरे साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे देणे थकविले. तनपुरे कारखान्याच्या व्यवस्थापनाने चालू वर्षी गाळप सुरू करण्याची परवानगी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयाकडे मागितली हाेती; परंतु शेतकऱ्यांची देणी थकविल्याने साखर आयुक्त कार्यालयाने तनपुरे कारखाना सुरू करण्यास परवानगी दिली नाही.
...
सुरू असलेले कारखाने
संजीवनी, कोपरगाव, प्रवरा, अशोक, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा, श्रीगोंदा, स्व. भाऊसाहेब थोरात, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, मुळा, अगस्ति, केदारेश्वर, कुकडी, श्री क्रोती शुगर, पीयूष शुगर, अंबालिका, गंगामाई, साईकृपा-१, प्रसाद शुगर, जय श्रीराम, यूटेक शुगर.
...
सहकारी-१४, खाजगी-०९.