शिर्डी : साईभक्त के. व्ही. रमणी यांच्या देणगीतून उभ्या राहिलेल्या आय.एस.ओ. मानांकित साईआश्रम-१ या भक्तनिवासाने कात टाकली आहे. अत्यल्प दरात मिळणा-या दर्जेदार सुविधांमुळे हे भक्तनिवास भाविकांच्या पसंतीला उतरत आहे.केवळ दोनशे रूपयात मिळणारी साधी व पाचशे रूपयात मिळणारी तीन खाटांची वातानुकूलित खोली, एवढेच या भक्तनिवासाचे वैशिष्ट्य नाही. येथील हिरवाई, स्वच्छता, सुरक्षितता व अलिकडे वाढलेला निटनेटकेपणा भाविकांना भुरळ घालत आहे. या भक्तनिवासात एकूण १ हजार ५३६ खोल्या आहेत. यात ३८४ वातानुकूलित तर १ हजार १५२ साध्या खोल्या आहेत. ८० टक्के खोल्यांचे आगाऊ आॅनलाइन बुकिंग करण्यात येते. वीस टक्के खोल्या काउंटरवर येणा-या किंवा जनसंपर्क कार्यालयामार्फत आलेल्या भाविकांना देण्यात येतात. येथे जवळपास साडेसात हजार भाविकांची निवासाची सोय होऊ शकते.भक्तनिवासात जाण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी आता स्वतंत्र प्रवेशद्वार बनविल्याने भक्तनिवास समोरील नगर-मनमाड मार्गावरील बजबजपुरी बंद झाली आहे. भक्तनिवासात सोलरद्वारे गरम पाणी, सकाळी केवळ पाच रूपयात नाश्ता पाकिट, बुक स्टॉल, प्रसाद लाडू विक्री, ऐसपैस पार्किंग, मंदिरात जाण्यासाठी मोफत बससेवा या सुविधांबरोबरच भाविकांना येथेच प्रसादालयात मोफत जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ओपन टू स्काय जीम
भाविकांना मोफत व सशुल्क दोन्हीही दर्शन पासेस येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रतीक्षालयात समाधी मंदिरातील लाईव्ह दर्शन बघण्याची सुविधा आहे. भक्तनिवास ढेकणमुक्त करण्यात यश आले आहे. भाविकांना सकाळी व्यायाम करण्याची सुविधा असावी, म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांच्या संकल्पनेतून ओपन टू स्काय जिममध्ये व्यायामाची अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविकांचे सामान किंवा वृद्धांची भक्तनिवासाच्या परिसरात ने-आण करण्यासाठी बॅटरीवर चालणारी वाहने आहेत.
देशी-विदेशी झाडांनी परिसर नयनरम्य
रूम असो की परिसर भक्तनिवासचा संपूर्ण परिसर दृष्ट लागण्यासारखा स्वच्छ व निटनेटका झाला आहे. या परिसरात हजारो झाडे लावण्यात आली आहेत. यात फुलझाडांसह देशी-विदेशी झाडांनी परिसर नयनरम्य बनला आहे. भक्तनिवासांची नियमावलीही याठिकाणी प्रथमच करण्यात आली असून ती भाविकांना बघण्यासाठी दर्शनी भागात लावण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी मनोज घोडे, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख पुंजा कोते यांनी या भक्तनिवासाचे रूपडे अमूलाग्र पालटून टाकले आहे.