शिर्डी : साईबाबांच्या मूळ पादुकांचा दौरा रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून शिर्डी ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण बुधवारी दुस-या दिवशीही सुरुच होते. उपोषणाकडे संस्थान पदाधिकारी फिरकले नाहीत.पादुका दौरा रद्द केल्याचे साईबाबा संस्थान व्यवस्थापन मंडळ जोपर्यंत लेखी देत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा दिला आहे. साईभक्त बायजा माँ यांचे वंशच सर्जेराव कोते यांनी उपोषणाच्या दुस-या दिवशी पाणीही वर्ज्य केले आहे. संस्थानने बाबांच्या वस्तू तसेच मूळ पादुका दर्शनासाठी देश-विदेशात नेऊ नये, साईशताब्दीनिमित्त मूळ पादुका शिर्डीत मंदिर परिसरात भाविकाच्या दर्शनासाठी खुल्या कराव्यात, अशी मागणी केली, पादुका दौ-यास विरोध दर्शवूनही पादुका दौरा नियोजनाप्रमाणे सुरूच ठेवला आहे. त्यामुळे ग्रामदैवत मारुती मंदिराजवळ पादुका दौरा विरोधी समितीचे तुकाराम गोंदकर, सजेर्राव कोते,प्रमोद गोंदकर, दत्तात्रय आसने, मिलिंद कोते, मुरली गायके,अमोल गायके,नारायण थोरात, मंगेशराव वडनेरे,राम आहेर, विकी गोंदकर आमरण उपोषणास बसले आहेत. या उपोषणास विविध सामाजिक संघटना तसेच शिर्डी ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला.दुसºया दिवशी नगराध्यक्ष योगिता शेळके, नगरसेवक अभय शेळके, सामाजिक कार्यकर्ते धनंजय शेळके, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य पतिंगराव शेळके,गणेशचे उपाध्यक्ष प्रताप जगताप, संचालक मधुकर कोते, शिर्डी सोसायटीचे चेअरमन साईराम गोंदकर, संचालक अप्पासाहेब कोते, विनायक कोते, रविंद्र कोते, माजी नगरसेवक प्रकाश शेळके, रमेश गोंदकर, सुरेश आरणे, यादव कोते, निवृत्ती शिंदे, विठ्ठलराव शिंदे, डॉ. रमेश कोते यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी उपोषणस्थळी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला. पादुका दौरा रद्द संदर्भात जो पर्यंत संस्थानकडून लेखी मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय पादुका दौरा विरोधी समितीने घेतला आहे.
साईबाबांच्या पादुकांचा दौरा : दुस-या दिवशीही शिर्डीत उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 8:54 PM