श्रीरामपूर : साईनगर-पुणे इंटरसिटी रेल्वे तातडीने सुरू करावी, अशी मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्याची माहिती प्रवासी संघटनेचे सचिव अनिल कुलकर्णी यांनी दिली.
नगर जिल्ह्याच्या दृष्टीने पुण्याकडे सकाळी जाणाऱ्या रेल्वेची गरज आहे. एसटीने प्रवासासाठी पाच ते सहा तास खर्ची पडतात. आर्थिक भुर्दंड बसतो. वाघोली परिसरात बस व खासगी वाहन प्रवासात एक तास वेळ जातो. साईनगर-पुणे इंटरसिटी रेल्वे शिर्डीतून सकाळी ६ वाजता सोडल्यास पुणे बायपासमार्गे ९.३० वाजता पोहोचेल. त्यामुळे उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी व नोकरदारांची गैरसोय दूर होईल.
राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नगर, श्रीगोंदा तालुक्यातील प्रवाशांना लाभ होईल. त्याचप्रमाणे वाराणसी-हुबळी एक्स्प्रेस, म्हैसूर-वाराणसी, पुणे-नागपूर गरीबरथ रेल्वेला बेलापूर स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणी खासदार लोखंडे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.
--------------