शिर्डी : साईनगरीत भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी नगरपंचायत व महसूल विभागाने विक्रेत्यांचे विकेंद्रीकरण करण्याबरोबरच सोशल डिस्टन्सींग सक्तीचे केले आहे. प्रांताधिकारी गोंविंद शिंदे व मुख्याधिकारी सतिष दिघे यांनी या संदर्भात एक पत्रक काढले आहे. आठवडा बाजाराबरोबरच रोज भरणारी मंडई बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी प्रत्येक उपनगरात भाजीपाला विक्रीच्या चौदा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यात लक्ष्मीनगर, दत्तनगर, कालिकानगर, बनरोड, बिरेगाव बन, पाचशे रूम, साकुरी शिव, पानमळा चौक, गणेशवाडी, श्रीकृष्णनगर, विश्वकर्मा मंदिर, कनकुरी रोड, खंडोबा मंदिर आदी ठिकाणांचा समावेश आहे. प्रत्येक ठिकाणी दोन भाजीपाला विक्रेते पंधरा-वीस फूट अंतर ठेवून बसणार आहेत. त्यांना आपल्या दुकानासमोर चुन्याने सहा ते आठ फूट अंतराने चार फूट बाय चार फुटाचे चौकोन आखावे लागणार आहेत. एका चौकोनात एका ग्राहकाला उभे करूनच ग्राहकांची रांग लावून भाजीपाला विकावा लागणार आहे. एका दुकानात एकच विक्रेता असणे बंधनकारक असणार आहे. परिसरात स्वच्छता ठेवणे, दुकान लावून भाजीपाला विकणारे किंवा फिरून भाजीपाला विकणारांना ओळखपत्र बरोबर ठेवावे लागणार आहे. योग्य दराने भाजीपाला विक्री करणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय दुकानांच्या व्यतिरिक्त हातगाडी किंवा अॅपे रिक्षाद्वारे नागरिकांच्या वसाहतीपर्यंत किंवा घरापर्यंत भाजीपाला विक्रीसही अनुमती देण्यात आली आहे.भोंगा लावून सूचनासाईनगरीत गाडीला भोंगा लावून शहरातील नागरिकांना घरातच थांबण्याच्या सूचना लाऊड स्पीकरवरून करण्यात येत आहेत. उपनगरातील प्रत्येक कॉलनीतही स्वच्छता व फवारणी सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी सतिष दिघे यांनी दिली.
साईनगरीत सोशल डिस्टन्सींग सक्तीचे; रोज भरणारी मंडई बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 5:44 PM