नेवासा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील नेवासा ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पायी आषाढी वारी पालखी दिंडी सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे निर्माते गुरुवर्य ब्रम्हलिन बन्सी महाराज तांबे यांनी सुरू केलेल्या या दिंडीला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत.ज्ञानेश्वरीच्या रचनास्थान असलेल्या या दिंडीचे महत्व पंढरपूरमध्ये मोठे आहे.
नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाच्या बैठकीत यावर्षी कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे दिंडी सोहळे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या आदेशाचे पालन म्हणून विश्वस्त मंडळाने दिंडी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.एकादशीच्या आदल्या दिवशी शासनाची परवानगी घेऊन पंढरपूरला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका नेल्या जाईल तेथे चंद्रभागा नदीत पादुकांना अभिषेक घालण्यात येईल त्यानंतर आरती व क्षेत्र प्रदक्षिणा घालून पादुका पुन्हा नेवासा येथे आणल्या जातील, असा ही निर्णय यावेळी ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीच्या प्रसंगी घेण्यात आला.यावेळी झालेल्या बैठकीस संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष अँड.माधवराव दरंदले, विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग,भिकाजी जंगले,रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर माऊली शिंदे,कृष्णाभाऊ पिसोटे,कैलास जाधव हे उपस्थित होते.
देशात व महाराष्ट्रात कोरोनाचे संकट आल्यानंतर सर्व देवस्थानने घेतल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर देखील तेव्हापासून बंद आहे परिसराची स्वच्छता व पूजाअर्चा फक्त नित्यनेमाने केली जाते.यंदा तरी दिंडी निघेल अशी अपेक्षा महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांना होती मात्र कोरोनाचे संकट अजून ही देशात व महाराष्ट्रात असल्याने शासन निर्णय देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असल्याने त्या निर्णयाचा मान ठेऊन व राष्ट्रीय कर्तव्य समजून यंदाची आषाढी वारी दिंडी रद्द करण्याचा निर्णय संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानने घेतला असल्याने कोणीही दिंडीसाठी मंदिरात येऊ नये असे आवाहन हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्यासह संस्थानच्या विश्वस्त मंडळाने वारकरी भक्तांना केले आहे.