जवळे : अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाणा-या श्रीक्षेत्र पिंपळनेर (ता.पारनेर) येथील श्री संत निळोबाराय महाराज यांच्या पादुकांना आषाढीनिमित्त पंढरपूरला चंद्रभागेच्या गंगेत स्नान घालण्यात आले.
चालू वर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याने संपूर्ण पंढरपूर शहरात शुकशुकाट होता. प्रत्येक चौकाचौकात पोलिसांचे फौजफाटा होता. महाराष्ट्रातील फक्त दहा संतांच्या पालख्याना प्रवेश देण्यात आला होता. प्रत्येक पालखीबरोबर फक्त वीस वारकरी होते.
दरम्यान मंगळवारी सकाळी श्रीक्षेत्र पिंपळेनर येथून श्री संत निळोबाराय महाराजांच्या पालखीचे एस. टी.बसने पंढरपूरकडे प्रस्थान झाले होते. उद्या (२ जुलै) पादुका विठ्ठल मंदिरात नेण्यात येणार आहेत.
जगावर व देशावर आलेले कोरोनाचे सावट लवकर दूर व्हावे, यासाठी भाविकांनी पांडुरंगाला साकडे घातले आहे.