अहमदनगर : सिनेमातील रूपेरी पडद्यावरील तारका आता साकळाई जलसिंचन योजना मार्गी लागावी यासाठी नगरमध्ये अवतरल्या आहेत. सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या उपोषणात सहभागी होण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील तारकांनी शनिवारी हजेरी लावली. दरम्यान आज उपोषणाचा तिसरा दिवस असून शासनाने कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही.नगर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी लागावी यासाठी दीपाली सय्यद यांनी शुक्रवारपासून जिल्हा परिषद आवारात उपोषण सुरू केले आहे. योजनेस मंजुरी मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार त्यांनी केला. मात्र शनिवारी उपोषणाचा दुसरा दिवस असूनही सरकारी पातळीवर त्यांच्या उपोषणाची कोणीच दखल घेतली नाही. कोणत्याच अधिकाऱ्यांनी शनिवारीही उपोषणाकडे हजेरी लावली नाही. आज तिसरा असून अद्याप कोणीही दखल घेतलेली नाही.मात्र दीपाली यांना पाठिंबा देण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील काही तारकांनी उपोषणात हजेरी लावत आंदोलनाला पाठिंबा दिला. यात अभिनेत्री मानसी नाईक, माधुरी पवार, सीमा कदम, श्वेता परदेशी, सायली पराडकर आदी तारकांचा समावेश होता.उपोषणाची सरकारने दखल घ्यावीया तारकांनी उपोषणस्थळी येऊन भाषणेही केली. पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. शासकीय आरोग्य विभागामार्फत दीपाली यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना अशक्तपणा जाणवत असून त्यांच्या उपोषणाची सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी सिनेतारकांनी केली. उपोषणात साकळाई कृती समितीचे बाबा महाराज झेंडे, समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी व ३५ गावातील शेतकरी सहभागी झाले आहेत. शहरी भागात राहून तारकांनी पाणी टंचाईवर केलेल्या भाषणामुळे उपस्थितही भारावले.
साकळाई पाणी योजना : दीपाली सय्यद यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस, अद्याप शासनस्तरावरून दखल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:32 PM