मुंबई - निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांविरोधी प्रचार करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज पहिली सभा होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखेंच्या प्रचारात अहमदनगर जिल्ह्यात त्यांची प्रचारसभा होणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी रात्रीच मुंबईहून देवगिरी एक्सप्रेसने नांदेडला पोहोचले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही सकाळी लवकरच राज्यात पोहोचले आहेत. अहमदनगरमध्ये सकाळी 11:00 वाजता मोदींची रॅली असून निरंकारी भवन (नगर शहर जॉगींग ट्रॅक), जवळील प्रांगणात मोदींची सभा होणार आहे. त्यामुळे आजच्या सभेत मोदी काय बोलणार? त्यावरच राज ठाकरे आपली तोफ डागणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, राज ठाकरेंनी आजच्या सभेलाही मोदींसंदर्भातील पोलखोल कार्यक्रम ठेवला आहे का, तसेच आजच्या सभेतून काय बाहेर येईल, असेही अनेक प्रश्न जनतेला पडले आहेत.
दरम्यान, नांदेड शहरातील नवीन मुंडा मैदानावर आज शुक्रवार सायंकाळी साडे पाच वाजता राज ठाकरेंची सभा होईल. निवडणूक दौऱ्यातील राज ठाकरेंची ही पहिलीच सभा असून आणखी 19 तारखेपर्यंत आणखी 5 म्हणजेच एकूण सहा सभांचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यात, शेवटची सभा शुक्रवारी 19 एप्रिल रोजी रायगड येथे होत आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे.