विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील चिखली व कोरेगाव गावांचे सीमेवर असलेल्या साकळाईदेवीचा यात्रा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.
दरवर्षी माघ पौर्णिमेला चिखली व कोरेगावच्या डोंगररांगेत असलेल्या साकळाईदेवीची यात्रा भरते. या यात्रेसाठी नगर शहर, नगर व श्रीगोंदा तालुक्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. डोंगररांगेत निसर्गरम्य ठिकाण हे देवस्थान असल्यामुळे तरुणाई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करत असते. कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रभावामुळे या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी होणारा यात्रौत्सव रद्द करण्याचा निर्णय यात्रौत्सव समितीने घेतला आहे. या दिवशी कोणत्याही भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी न करता, आपआपल्या घरी साकळाई मातेच्या फोटोची पूजा करावी. प्रशासनाने कोरोना महामारी रोखण्यासाठी जे निर्बंध घालून दिले आहेत, त्याचे पालन करावे, असे आवाहन पोलीस पाटील बाळासाहेब लंके, रामदास कानडे, बाळासाहेब साबळे, रोहित राऊत आदींनी केले आहे.