कोपरगाव : कृषी सेवा केंद्रातून मुदत संपलेल्या बियाणांची विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्याने कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील शेतकरी पुरुषोत्तम दुर्गादास टेके या शेतकऱ्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी बीजांकुर बीज या कंपनीच्या दोन बियाणांच्या पाकिटाची कोपरगाव शहरातील कृषीदीपक या कृषी सेवा केंद्रातून ३० नोव्हेंबर २०२० रोजी खरेदी केली होती. मात्र, संबंधित दुकानदाराने या बियाणांची विक्री करताना पक्क्या बिलावर चालू मुदतीच्या बियाणांचा लॉट नंबर टाकून मुदत संपलेल्या बियाणांची दोन पाकिटे दिली. सोमवारी (दि.७) बियाणाची लागवड करताना पाकिटांवर लागवडीसंदर्भात सूचना वाचताना ते बियाणे मुदत संपलेले असल्याचे टेके यांच्या लक्षात आले. त्यावर कृषीदीपक या दुकानातून आपली फसवणूक झाल्याची टेके यांची खात्री पटल्यानंतर त्यांनी सोमवारी (दि.७) कोपरगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. यासंदर्भात कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
..........
संबंधित दुकानदाराने मुदत संपलेल्या बियाणांची विक्री करून माझी फसवणूक केली आहे. त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, यासाठी तक्रार दाखल केली आहे. जेणेकरून इतरही शेतकऱ्यांची यापुढे फसवणूक होणार नाही.
- पुरुषोत्तम टेके, शेतकरी, वारी.
...........
सदरच्या बियाणांचा साठा संपलेला होता. त्यामुळे दुकानातील कर्मचाऱ्यांनी मुदत संपलेल्या बियाणांची संबंधित शेतकऱ्याला विक्री केली आहे. मुदत संपलेल्या बियाणांची विक्री केल्याची चूक मान्य आहे.
- दीपक गव्हाळे, संचालक, कृषीदीपक कृषी सेवा केंद्र, कोपरगाव