अहमदनगर: शहरातील वाडियापार्क येथील तीन मोबाईल शॉपीमध्ये इंटेक्स कंपनीचे तपासी अधिकारी व पोलिसांनी छापा टाकून इंटेक्स कंपनीचे ब्रॅण्ड नेम वापरून तयार केलेल्या ८९ हजार ३०० रूपयांच्या ६२८ बनावट बॅट-या व २०२ फ्लिप कव्हर जप्त करण्यात आले. गुरूवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.याप्रकरणी इंटेक्स टेक्नॉलॉजिस्ट कंपनीचे तपासी अधिकारी निखिल पाटील यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुरूवारी पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवडे यांच्या पथकाने वाडियापार्क येथील अमेय मोबाईल शॉप येथे छापा टाकला. या ठिकाणी इंटेक्स कंपनीचे बनावटीकरण करून विक्रीसाठी ठेवलेल्या १६ हजार ८०० रूपये किमतीच्या १६७ बॅट-या आढळून आल्या. यावेळी या शॉपीच्या शेजारीच असलेल्या शिवसागर मोबाईल शॉप येथे टाकलेल्या छाप्यात ३१२ बनावट बॅट-या आढळून आल्या. त्यानंतर आनंदभक्ती मोबाईल शॉपीत १४८ बनावट बॅट-यांसह इंटेक्स कंपनीच्या नावे तयार केलेले २०२ फ्लिप कव्हर जप्त करण्यात आले. याप्रकरणी बाळासाहेब जगताप, हरिसिंग राजपूत व अजय बाफना यांच्यावर कॉपीराईट अॅक्ट १९५७ कलम ६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.