लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना जुन्याच किमतीत खते देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शेतकऱ्यांना जे खत पाहिजे ते मिळत नाही. नको असलेल्या कंपन्यांचीच खते जुन्या दराने शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. त्यामुळे खतांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे सांगण्यात आले.
खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची खरेदी केली जात आहे. काही भागात ऊस पिकासाठी खतांची मागणी वाढली आहे. मध्यंतरी कंपन्यांनी खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ केली होती. परंतु, सरकारने खतांच्या अनुदानात वाढ केली. त्यामुळे शेतकऱ्यांना जुन्या दराने खते खरेदीची संधी मिळाली. खतांच्या कंपन्यांबाबत शेतकरीही जागृत आहेत. ते नामवंत कंपन्यांच्याच खतांची मागणी करतात. परंतु, कृषी सेवा केंद्र चालक शेतकरी ज्या कंपन्यांची खते मागतात, ते शिल्लक नसल्याचे सांगून जे खत नको आहे, तेच घेण्यास भाग पाडतात. त्यामुळे खतांच्या मात्रा देताना त्यात बदल करावा लागत आहे. जिल्ह्यात पुरेसे खत उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र खते उपलब्ध नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना नको असलेल्या खतांची सर्रास विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांनाही नाईलाजाने खते खरेदी करावे लागत असून, ही एकप्रकारे शेतकऱ्यांची फसवणूकच आहे. याशिवाय सरकारने जाहीर केलेल्या किमतीत किरकोळ वाढ करून खते विकली जात आहेत. युरियाची सरकारी किंमत २६६ रुपये आहे. परंतु, युरियाची एक बॅग २७० रुपयांना विकली जात असून, इतर खतांच्या किमतीतही अशी किरकोळ वाढ करण्यात आली आहे. किरकोळ दरवाढ करत नको असलेली खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जात असल्याचे समोर आले आहे.
....
हा घ्या पुरावा
उसासाठी शेतकऱ्याने इफको कंपनीच्या युरियाच्या चार गोण्यांची मागणी केली. परंतु कृषी सेवा चालकाने या कंपनीचा युरिया शिल्लक नाही. काही दिवस थांबावे लागेल, असे शेतकऱ्याला सांगितले. शेतकऱ्याने दोन तरी द्या, अशी मागणी केल्यानंतर २७० रुपयाला आहे. चालेल का, अशी विचारणा कृषी सेवा चालकाने केली. त्यावर नाईलाजाने शेतकऱ्याने होकार दिला. आधी शिल्लक नाही, असे सांगितले. परंतु, ग्राहकाची गरज ओळखून २७० रुपयाला युरियाच्या दोन बॅग दिल्या.
......
केंद्र सरकारने अनुदान दिल्याने सर्व कंपन्यांच्या डीएपीची किंमत १२०० रुपये इतकी आहे. परंतु, टंचाई असल्याचे कारण देऊन कृषी सेवा चालकाने १२५५ रुपये किंमत सांगितली. त्यामुळे शेतकऱ्यानेही नाईलाजाने ५५ रुपये जास्तीचे देऊन डीएपी विकत घेतले.
....
उसाला पावसाळ्यापूर्वी डोस द्यायचा आहे म्हणून कृषी सेवा केंद्रात गेलाे. ज्या कंपन्यांची खते मागितली. त्या कंपन्यांची शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. इतर कंपन्यांची खते आहेत, हवी असल्यास देतो, असे उत्तर शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्र चालकांकडून मिळत आहेत.
- नेवासा येथील शेतकरी
....
युरियाच्या दहा बॅग घ्यायच्या होत्या. परंतु, दोनच बॅग मिळाल्या. शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. खतांची टंचाई असल्याने भाव काही प्रमाणात वाढलेले आहेत. पण, मागणीप्रमाणे खते मिळत नाहीत.
-शेवगाव येथील शेतकरी
....
जुने दर
इफको
१०:२६:२६- ११७५
१२:३२:१६- ११९०
२०:२०:०-९७५
डीएपी-११८५
....
आयपीएल
डीएपी-१२००
२०:२०:०-९७५
पोटॅश-८५०
....
महाधन
१०:२६:२६-१२७५
२४:२४:०-१३५०
....
सरदार
१०:२६:२६-१३७५
२०:२०:१३-१०००
१२:३२:१६-११९०
...
सुपर फोस्फेट-४००
.....
नवीन दर
युरिया-२६६.५
डीएपी-१२००
२४:२४:९-१४५०
२४:२४:०८-१५००
१०:२६:२६-११७५ ते १३७५
१२:३२:१६-११८५ ते १३१०