अहमदनगर : कोरोनाकाळात हाताला काम नसल्याने गोरगरीब जनता उपाशी राहणार नाही, यासाठी स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून काहींना मोफत, तर काहींना अल्पदरात धान्य दिले जात आहे. मात्र काही लाभार्थी त्यांच्या नावावर घेतलेले धान्य दुकानदार, व्यापारी, इतर नागरिकांना विकत आहेत. मोफत घेतलेले धान्य दहा रुपये किलो दराने विकले जात असल्याचा प्रकार जिल्ह्याच्या अनेक भागात सुरू आहे.
कोरोनाच्या काळात नागरिकांना सरकारने मोफत धान्य दिले. राज्य व केंद्राने घोषणा केल्याने लाभार्थींना दुप्पट धान्य मिळाले. अंत्योदय योजनेच्या एका लाभार्थींकडे एका महिन्याला ५० किलोच्या वर धान्य घरात येऊ लागले. मात्र मोफत धान्य घेऊन ते कसे खायचे, असाही प्रश्न अनेक लाभार्थींना असतो. त्यामुळे लागेल तेवढे धान्य ठेवून घेतात आणि इतर धान्याची बाजारात, दुकानात विक्री करतात. अंत्योदय व दारिद्यरेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य दिले जाते. मोफत, तसेच २ रुपये व ३ रुपये किलो मिळणारे हे धान्य १० रुपये किलो दराने विकले जात असल्याचे ‘लोकमत’च्या विविध ठिकाणच्या वार्ताहरांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
------------
अंगठा दिल्याशिवाय लाभार्थीला धान्य मिळत नाही. धान्य वाटपाची प्रक्रिया ऑनलाइन असते. त्यामुळे दुकानात घोटाळा होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. लाभार्थींनी घेतलेल्या धान्याचे काय होते, ते घरी वापरतात की विकतात, याबाबत कारवाई करण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना किंवा आदेश नाहीत. या प्रकारावर पुरवठा विभाग नियंत्रणही ठेवू शकत नाही. त्यामुळे असे प्रकार आढळले तर त्यावर काय कारवाई करायची, याचे कोडेच आहे.
- जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी
--------
जिल्ह्यातील रेशनकार्डधारक
जिल्ह्यातील रेशनकार्डधारक- १०,८८,३८५
बीपीएल- ६,०५,५२४
अंत्योदय- ८८,६१८
केशरी- ३,३५,६६०
--------------
मोफत धान्य कोणाला
नगर जिल्ह्यासाठी एका महिन्यात ३१ लाख ४६ हजार इतक्या लाभार्थींसाठी १५ हजार मेट्रिक टन धान्य मिळते. एका लाभार्थीला तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळतो. असे पाच किलो धान्य एका महिन्यासाठी मिळते. कुटुंबात पाच व्यक्ती असतील तर २५ किलो धान्य मिळते. याशिवाय राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मोफत धान्य मिळत असल्याने एका कुटुंबात किमान ५० किलो धान्य प्रतिमाह मिळते. मिळालेल्या धान्यातून काही धान्य विकून ज्वारी-बाजरी घेतली जाते, असे राहाता तालुक्यातील लाभार्थींनी सांगितले.
--
डमी क्रमांक-११७५