अहमदनगर : सलून व्यवसाय करण्यास बंदी घातल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध करण्यात आला. परवानगी न दिल्यास धार्मिक विधी, दशक्रिया विधी बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्षा शांताराम राऊत यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन दिले. यावेळी उत्तर विभागीय सरचिटणीस सुनील वाघमारे, राज्य कार्य. सदस्य विकास मदने, जिल्हा सलून चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष जनार्दन वाघ, युवा जिल्हाध्यक्ष शरद दळवी, शहराध्यक्ष विशाल मदने उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. बंदी न हटविल्यास दशक्रिया विधीसह सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बहिष्कार टाकू, शासनाने २० हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अन्यथा रस्त्यावर उतरविण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला.
गेल्या वर्षी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील सलून व्यवसाय मोडकळीस आला आहे. सुरुवातीच्या काळात शासनाकडे बिहार, आंध्र प्रदेश, राज्यस्थान या राज्यांमध्ये सलून व्यवसायाला ज्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात आली, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने २० हजार रुपयांची आर्थिक मदत करावी. गाळा भाडे, लाईट बिल माफ करण्यात यावे. यासाठी नगर शहरामध्ये आमरण उपोषण करण्यात आले होते, याचीही आठवण राऊत यांनी करून दिली.
सर्व आस्थापनांना व गर्दी होणाऱ्या ठिकाणांना काम करण्याची सकाळी आठ ते सायंकाळी सातपर्यंत सवलत दिलेली आहे. मग सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिकच लक्ष्य का करण्यात आले, असा सवालही करण्यात आला आहे.
निवेदनावर शिवाजी दळवी, अरुण वाघ, बापू क्षीरसागर, नासिर शेख, इम्रान शेख, अब्दुल रहेमान, सतीश साळुंके, अशोक खामकर, सुरेश राऊत, राजेंद्र ताकपेरे, दीपक बिडवे, बाळासाहेब शेजूळ, गणेश कदम, अजय कदम, सुनील खंडागळे, संतोष वाघमारे, आदींसह सलून व्यवसायिकांच्या सह्या आहेत.
--------
फोटो- ०५ सलून
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलून व्यावसायिकांनी सोमवारी निदर्शने केली.