कोतूळ : गेल्या दोन महिन्यांपासून कोतूळ व ब्राह्मणवाड्यात एकाच दिवशी चो-या होत आहेत. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास कोतुळमध्ये भांड्याचे दुकान तर ब्राह्मणवाड्यात स्टेट बँकेच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.गेल्या दोन महिन्यांपासून कोतूळ व ब्राह्मणवाड्यात भुरट्या चोरांच्या उपद्रवाने नागरिक हैराण झाले आहेत. शुक्रवारी दिवसभर अकोल्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनात पोलीस यंत्रणा गुंतल्याने चोरट्यांनी कोतूळ येथील ब्राह्मणवाडा नाक्यावरील भानुदास वसंत देशमुख यांचे गृहोपयोगी साहित्याचे दुकानाचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केला. हा प्रकार समोरच्या इमारतीमधील रहिवाशांना दिसल्यानंतर त्यांनी मोबाईलमधून शुटिंग घेण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच चोरांनी पळ काढला. मात्र काही तासातच ब्राह्मणवाडा येथील मुख्य रस्त्यावरील स्टेट बँकेच्या एटीएम केंद्राचे शटर उचकटून एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे काढता न आल्याने तेथून पळ काढला. या चोरी सत्राने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा त्वरित तपास लावण्याची मागणी ब्राह्मणवाड्याच्या सरपंच सखुबाई फलके , उपसरपंच भारत आरोटे, प्रकाश भळगट, पोपट हांडे, चंद्रकांत गोंदके यांनी केली आहे.दोन महिन्यांपूर्वी कोतूळ येथील याच दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी वीस हजारांची रोकड व इतर साहित्य लंपास केले होते. त्याच दिवशी ब्राह्मणवाड्यातील डॉ. कुमकर यांचे औषधी दुकानही फोडल्याने कोतूळ , ब्राह्मणवाडा चोरी प्रकरणाचे अजब कनेक्शन दिसते.
कोतूळ ब्राह्मणवाड्यातील सर्व व्यापारी व नागरिकांनी आपल्या दुकानांत सीसीटीव्ही बसवावेत. त्यातून काही धागेदोरे हाती येऊ शकतात. ग्रामसुरक्षा दलाने सजग व्हावे. या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल.-अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, अकोले.