जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीची ऑनलाईन सभा शुक्रवारी सभापती सुनील गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत सदस्य संध्या आठरे, सोनाली रोहणारे, शांताबाई खैरे, दिनेश बर्डे, वंदना लोखंडे, रावसाहेब कांगुणे, सुनीता दौंड, तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सुनील तुंभारे यांनी सहभाग घेतला.
पशुसंवर्धन विभागातर्फे वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना असून त्यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२० आहे. या योजनांसाठी लाभधारकांकडून अर्ज मागविण्याचे सभेत ठरले. अनुसूचित जातीच्या लाभधारकांना दुधाळ जनावरांचे गट पुरविणे, त्यांच्या जनावरांना १०० टक्के अनुदानावर पशुखाद्य पुरविणे, आदिवासी क्षेत्रातील तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीच्या लाभधारकांना दुधाळ जनावरे, तसेच शेळी गटाचा पुरवठा करणे, त्यांना पशुखाद्य पुरवणे अशा काही योजना आहेत. त्याबाबत अर्ज मागवण्याचे सभेत ठरले.
-------------
मंजूर अनुदान व योजनांवरील खर्च तात्काळ करण्याबाबत सूचना
शुक्रवारी दुपारी अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ समितीची सभा झाली. त्यात जि.प. सेस व जिल्हा नियोजनअंतर्गत मंजूर अनुदानाच्या खर्चाबाबत आढावा घेण्यात आला. मंजूर अनुदान व योजनांवरील पुढील खर्च तात्काळ करण्याबाबत सभापतींनी सर्व विभागप्रमुखांना सूचना केल्या. समाजकल्याण, महिला बालकल्याण व अपंग कल्याण आदी विभागांच्या सर्व योजनांचा आढावा घेऊन या योजनांचा लाभ फेब्रुवारी २०२१ अखेर लाभार्थींना देणेबाबत नियोजन कण्याच्या सूचना विभागांना देण्यात आल्या. सदस्य राजेश परजणे, शरद नवले, कोमल वाखारे, कैलास वाकचौरे, तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगल वराडे सभेत सहभागी झाले होते.